सिंदीत पहाटे भक्तिमय वातावरणात रंगतो काकड आरती सोहळा!

0

वारकरी भजन मंडळ जोपासत आहे 35 वर्षापासून परंपरा

🔥 सार्वजनिक हनुमान मंदिरात आयोजन

सिंदी (रेल्वे) : उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा l झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा l संत साधुमुनी अवघे झालेती गोळा l सोडा शेजसुख आता पाहू द्या मुखकमळा ll अशा काकड आरतीच्या अभंगातून पहाटे स्थानिक हनुमान मंदिर देवस्थान सिंदी (रेल्वे) येथे मंगलमय वातावरण निर्माण झाले असून भक्तिमय वातावरणात काकड आरती सोहळा रंगताना दिसत आहे. भल्या पहाटे वारकरी भजन मंडळ सिंदीतील ज्येष्ठ मंडळी व बालचमुसह काकडारतीला हजेरी लावून मागील 35 वर्षांपासून परंपरा जोपासत आहेत.
शहरातील असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले हनुमान मंदिर देवस्थान संस्थान येथे वारकरी भजन मंडळाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा असा महिनाभर काकडा आरती सोहळा संपन्न होत असतो. रोज पहाटे पाच वाजता मंगलचरणाने सुरवात करत, भूपाळ्या, भजनमालिका वासुदेव, जोगी, आंधळे पांगुळ, मुका, बहिरा, गौळणी, नाटाचे अभंग व समारोप विनवणीचे अभंग आणि आरती, पसायदानाने या भक्तिमय सोहळ्याची सांगता होत असते. काकडा आरती सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी रोज भाविकांची उपस्थिती भल्या पहाटे मंदिरात असते. मागील 35 वर्षांपासून वारकरी भजन मंडळ ही परंपरा जोपासत असून संपूर्ण सोहळ्याचे नियोजन, येथील प्रगतिशील शेतकरी नरेश बानाइत व वारकरी भंजन मंडळाचे अध्यक्ष सोनू डकरे, जीवन डकरे, हरीचंद कातोरे, रवींद्र काटोले, नरेश डांगरे, मोहन मुडे, संजय काटोले, अरविंद कलोडे, राजेश पेटकर, नयन माहाजन, सुमित काटोले, धनराज मोरस्कर, पवन काटोले, केशव सोनटक्के, सतीश हटवार, सुधाकर घवघवे, गणेश सहारे, रवींद्र विनकने, योगेश कलोडे, बाबाराव झाडे हे करत आहेत.
अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमेला सुरू झालेला काकडा आरती सोहळा त्रिपुरारी पौर्णिमेला समाप्त होतो. भक्तीमय वातावरणात मंदिरांमध्ये काकड आरती सुरू झाल्याने अत्यंत प्रसन्न आणि भक्तिपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. रोज सकाळी काकड आरती, अभंग, भूपाळया, आंधळे-पांगूळ, वासुदेव, रूपकाचे अभंग, गौळणी महाआरतीद्वारे पूजा केली जाते व तीर्थप्रसाद दिला जातो.
‘भल्या पहाटे उठा जागे व्हारे आता l स्मरण करा पंढरीनाथा l भावे चरणी ठेवा माथा l चुकवी व्यथा जन्माच्या‘ अशा प्रकारचे संताचे अभंग आळवून झोपलेल्या समाजाला जागं करण्याचा प्रयत्न या काकड आरतीच्या माध्यमातून केला जातो आहे. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात अर्थात त्या दिवसापासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत वारकऱ्यांचे आराध्य दैवत श्री. पांडुरंग हे शयन करीत असतात अशी श्रद्धा आहे. म्हणजेच अश्विन शु. पौर्णिमा ते कार्तिक शु. पौर्णिमा या कालावधीत काकडारती उत्सव होत असतो.

दिनेश घोडमारे सहासिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!