सीमा शिंदे यांचे तात्काळ निलंबन करून विभागीय चौकशी करा

0

🔥सीमा शिंदे यांचे तात्काळ निलंबन करून विभागीय चौकशी करा.

🔥स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक; शेकडो बांधकाम कामगारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या नावे १७ मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर

वर्धा -/ जिल्ह्यातील बांधकाम कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात शेकडो बांधकाम कामगारांच्या उपस्थितीत धडक देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नावे चार पानी सविस्तर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात्मक निवेदनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. महिला व पुरुष बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडली.

संघटनेने दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वर्धा जिल्ह्यातील कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे हजारो अर्ज अनेक महिन्यांपासून प्रलंबित ठेवण्यात आले असून पात्र कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गरीब कामगारांना वारंवार कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असून वेळ, पैसा आणि मजुरीचा मोठा फटका बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनातील सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे शासकीय कामगार अधिकारी श्रीमती सीमा शिंदे यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्या संपूर्ण कार्यकाळाची उच्चस्तरीय विभागीय चौकशी करण्यात यावी, ही होती. संघटनेने आरोप केला आहे की, त्यांच्या कार्यकाळात प्रशासनात गंभीर अनियमितता झाली, हजारो अर्ज प्रलंबित राहिले आणि बांधकाम कामगारांना न्याय मिळण्यात मोठा विलंब झाला. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेने निवेदनात आणखी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, श्रीमती सीमा शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत आयडीचा वापर कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करून घेत विशिष्ट अर्ज निकाली काढल्याचा संशय आहे. या संपूर्ण प्रकरणाची सायबर फॉरेन्सिक चौकशी करून लॉगिन हिस्ट्री, IP लॉग, डिजिटल व्यवहार, अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया आणि संबंधित सर्व नोंदींची तपासणी करण्यात यावी. तसेच दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. हा आरोप संघटनेने आपल्या निवेदनात केला आहे.

निवेदनात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या ऑनलाइन प्रणालीतील गंभीर त्रुटींकडेही शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. अर्ज भरताना OTP न मिळणे, पोर्टल वारंवार बंद पडणे, अर्जाची स्थिती (Application Tracking) उपलब्ध नसणे, तांत्रिक कारणांमुळे पात्र अर्जदारांचे अर्ज रखडणे आणि लाभ मंजूर होण्यास मोठा विलंब होणे यामुळे हजारो कामगार आर्थिक आणि मानसिक संकटात सापडल्याचे संघटनेने नमूद केले आहे. या संपूर्ण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणून तात्काळ सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे एकूण १७ प्रमुख मागण्या मांडल्या असून त्यामध्ये प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा, पात्र कामगारांना सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ, ऑनलाइन प्रणाली पारदर्शक करणे, जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई, कामगार कल्याण मंडळाच्या कामकाजाची चौकशी, दोषींवर कायदेशीर कारवाई आणि कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारणे या मागण्यांचा समावेश आहे.

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांनी सांगितले की, “गरीब बांधकाम कामगारांवर अन्याय करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही. शासनाने तात्काळ निवेदनाची दखल घेऊन श्रीमती सीमा शिंदे यांना निलंबित करावे, विभागीय चौकशी सुरू करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटना संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र लोकशाही आंदोलन उभारेल. हजारो कामगारांच्या न्यायासाठी हा लढा शेवटपर्यंत सुरू राहील.”

शेकडो बांधकाम कामगारांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाने मुख्यमंत्री यांच्या नावे देण्यात आलेले निवेदन स्वीकारले. संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, निवेदनातील मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास जिल्हाभर व्यापक लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासन व संबंधित प्रशासनावर राहील. या वेळी विजय आष्टनकर,आशिष बुरबुरे,दिलीप कोरे,नरेंद्र मानकर,खटेश्वर देवलकर,राजेंद्र घोडमारे,श्रीकांत पाल,अतुल रेवसकर,विजय उमाटे,अरविंद गौळकर, नामदेव बोबाडे,दिनेश धुर्वे,सुनील नेहारे,अविनाश कोसाळे,प्रथमेश लाकडे, रजनी पोकळे,जयश्री ठाकरे,नीलिमा पळसकर,मनीषा कोंबे,लीला बोभाटे,आशा लाकडे,पुष्पा कराळे,वैशाली जयस्वाल,सुवर्णा पाचरूटकर,सुनंदा तरोने,देवेंद्र बावणे,पूनम देवतळे,रंजना देवतळे,सविता सरोदकर,काजल श्रीवास,मनीषा भुतेकर,मनीषा हेमने,शंकर डंभारे,गजानन चामचूर,अंकुश राजूरकर,हनुमान मस्कर,धर्मेंद्र पंचभाई,सचिन बुरबुरे,राजू झाडे,बंडू फुलझेले

यांच्या सह हजारो बांधकाम कामगार उपस्थित होते.

          ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!