सेलूच्या क्रीडा संकुलाला रबरी धावपट्टीची प्रतिक्षा..! सुर्यधरम स्पोर्टिंग क्लबचे पालकमंत्र्यांना साकडे.
सेलू : येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर खेळाडूंसाठी रबरी धावपट्टी(सिंथेटिक ट्रॅक) उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा अँथेलेटिक्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली स्थानिक सुर्यधरम स्पोर्टिंग क्लबच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. याप्रसंगी सुर्यधरमचे सागर राऊत तथा कैलास बिसेन उपस्थित होते.येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर खेळाडूंसाठी बऱ्याच गोष्टी उपलब्ध नसतानाही तालुक्यातील अनेक खेळाडूंनी राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर धडक दिली. अँथेलेटिक्ससाठी आवश्यक त्या सोयीसुविधांची येथे कमतरता असल्याने येथील खेळाडू राज्याच्या प्रतिनिधित्वापासून वंचित राहतात. येथे शाळा तसेच महाविद्यालया मार्फत बऱ्याच अँथेलेटिक्स स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. विदर्भ क्रास कंट्री स्पर्धेचे देखील येथे दरवर्षी आयोजन होत असून प्रशिक्षित खेळाडू स्वंयस्फूर्तीने खेळाडूंना प्रशिक्षण देतात. येथील अँथेलेटिक्सच्या खेळाडूंनी जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवर सेलू तालुक्यास नावलौकिक मिळवून दिला असून देश पातळीवर नेतृत्व करण्यासाठी येथील खेळाडू सक्षम असल्याचे वेळोवेळी दिसून येते. परंतु येथील मैदानावर सरावासाठी साधी रबरी धावपट्टी सुद्धा उपलब्ध नसल्याने येथील खेळाडू कुठे तरी कमी पडतात. त्यामुळे येथील मैदानावर तत्काळ रबरी धावपट्टी(सिंथेटिक ट्रॅक) उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालकमंत्री तथा वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आणि जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातून केली.याप्रसंगी जिल्हा अँथेलेटिक्स असोसिएशनचे सचिव रमेश बुटे, राजेश उमरे, सुर्यधरम स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष अँड रामप्रसाद लिल्हारे, सागर राऊत, कैलास बिसेन आदि पदाधिकारी उपस्थित होते.
सागर राऊत साहसिक न्यूज/24 सेलू