सेवा पंधरवडा’ कार्यक्रम भाजपा-शिवसेना (शिंदे गट) संयुक्त राबविणार

0

साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा :
राज्यात भाजप सेना शिंदे गटाची सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 20 ते 30 सप्टेंबर या दरम्यान महाराष्ट्रच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या अंतर्गत मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्धा जिल्हा कार्यकारिणी गठित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ‘सेवा पंधरवडा’ म्हणून देशात साजरा केला जात आहे. या सेवा पंधरवड्यात शिवसेना (शिंदे गट) ही सहभागी होणार असून, पक्ष संघटन आणि ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रम संयुक्तपणे राबविणार असल्याची माहिती शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेश सराफ यांनी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख गणेश ईखार, जिल्हा संघटक संदीप इंगळे, दिलीप भुजाडे, किशोर बोकडे, रवींद्र चव्हाण व नितीन देशमुख उपस्थित होते.
राजेश सराफ पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा या कार्यक्रमाचे देशभर आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत शिवसेनाही (शिंदे गट) सहभाग घेत जिल्ह्यातील प्रत्येक तालुका व प्रत्येक गावात पोहोचून सर्वसामान्यांची कामे निकाली काढणार आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण करणे, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणीपत्र देणे यासह 14 विभागनिहाय कामे या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचून आम्ही सेवा देणार असल्याचेही सराफ यांनी सांगितले.
यासोबतच त्यांनी पक्ष संघटन मजबुतीसाठी प्रत्येक तालुक्याचा दौरा करून लवकरच तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे सांगितले. येत्या नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही भाजपा-शिवसेना संयुक्तरित्या लढणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!