सोयाबीन करपल्याने शेतकरी संकटात,● युवा संघर्ष मोर्चाने वेधले प्रशासनाचे लक्ष.
देवळी:तालुक्यात सोयाबीन पीकावर ‘चारकोल रॉट’ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं असून बदलते वातावरण व मागील आठवड्यात झालेला सततचा पाऊस याला कारणीभूत ठरत आहे.आधीच एक महिना उशिरा पावसाला सुरुवात झाली.मात्र फार काळ पाऊस न झाल्याने शिवाय कडक उन्ह,कधी ढगाळ वातावरण तर कधी सततधार पावसाने शेतात पाणी जमा होणे अशा बदलत्या वातावरणामुळे या रोगांची उत्पत्ती झाल्याने पिकवाढीला फटका बसत आहे.त्यामुळे जवळपास जिल्ह्यातील सोयाबीन पीक धोक्यात आले आहे.हे वातावरण रोगांना पोषक ठरत असल्याने फवारणीच्या खर्चातही वाढ होत आहे.महिन्याभऱ्यापूर्वी पासून जिल्ह्यातील आर्वी आणि सेलू तालुक्यात मोठ्या प्रमाणात या रोगाचा प्रादुर्भाव आहे. मात्र आता देवळी तालुक्यात सुद्धा या रोगाने तोंड वर काढले आहे.पिके पिवळे पडून ते वाळत चालले आहे. या गंभीर समस्येबाबत तालुक्यातून अनेक शेतकऱ्यांनी युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांना फोन करून या नैसर्गिक आपत्ती बाबत माहिती दिली.शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच गांभीर्य लक्षात घेता.आज तातडीने तालुका कृषी अधिकारी कुंभारे यांना देवळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तक्रार दिली. त्यांतनर आज लगेच तक्रारींची दखल घेत,तालुका कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र,सेलसुरा चे शास्त्रज्ञ श्री निलेश वाजीरे यांच्या मार्फत पाथरी, इसापूर व इतर भागातील ‘चारकोल रॉट’ या रोगाने बाधित क्षेत्राची पाहणी करण्यात आली.सोबत युवा संघर्ष मोर्चाचे पदाधिकारी सुध्दा या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते.वातावरणीय बदलामुळे सोयाबीन पिकांच्या मुळाला बुरशीची लागण होऊन या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले.प्रामुख्याने ‘फुले संगम’ आणि ‘फुले किमया’ या सोयाबीनच्या वानावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्याचे पाहायला मिळाले.इसापूर येथील शेतकरी लोकेश मानकर यांचे संपूर्ण साडे चार एकरातील सोयाबीन या रोगामुळे उद्धवस्त झाले आहे. सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांकडून मोठा खर्च करण्यात आला आहे.परंतु पीके उद्धवस्त झाल्याने उत्पन्नात मोठी घट होणार आहे.तर काहींना सोयाबीन सोंगण्याची सुद्धा गरज पडणार नाही अशी भीती सुध्दा व्यक्त केल्या जात आहे.तोंडाशी येणारा घास या रोगाने हिरावून घेतला आहे. पूर्णपणे प्रादुर्भाव झालेल्या शेतातील सोयाबीनवर उपाय करणे फार कठीण आहे.आणि उपाय करून सुद्धा पीक हाती लागणार की नाही याची शाश्वती नाही.ऐन सणासुदीच्या दिवसांत उत्पन्नाची आस लावून बसलेला शेतकरी मात्र या संकटाने हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांपुढे मोठं संकट असून या परिस्थितीत युवा संघर्ष मोर्चा ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी व नैसर्गिक आपत्ती असल्याने पीक विम्यातून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी युवा संघर्ष मोर्चा करीत आहे.आलेल्या संकटातून बळीराजाला सावरण्याकरिता लवकरच युवा संघर्ष मोर्चा नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शासनाला निवेदन देणार आहेत.त्याकरिता शेतकऱ्यांनी तयार रहावे.आज विविध ठिकाणी नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करतेवेळी कृषी विज्ञान केंद्र,सेलसुरा चे शास्त्रज्ञ निलेश वाजीरे,कृषी विभागाचे प्रतीक्षा मेंढे,कृषी पर्यवेक्षक प्रशांत भोयर, युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांचेसह तालुका संघटक संदीप दिघीकर, मनोज नागपुरे, अविनाश धुर्वे, संजय चरडे, अमोल भोयर, विनय महाजन, लोकेश मानकर व असंख्य शेतकरी उपस्थित होते.
सागर झोरे सहासिक न्यूज-24