अपघातास कारणीभूत असलेला आरोपी अरुण झाडेवर कारवाई करा.
🔥 भारती गवळी यांची सिंदी पोलिसात तक्रार
🔥 दीड महिन्यांपूर्वी झाला होता अपघात.
🔥 अपघातात विजय गवळी यांचे दोन्ही पाय निकामी
सिंदी (रेल्वे) : येथील सिंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोडणाऱ्या मौजा परसोडी शिवारात शेतात ट्रॅक्टरने रोटावेटर करत असताना ट्रॅक्टर चालक अरुण झाडे याने शेतकऱ्याला जबरदस्तीने रोटावेटरची टॅपलिंग कसायला लावली. यामध्ये ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने शेतकरी विजय गवळी यांच्या पायावरून रोटावेटर गेल्याने त्यांच्या दोन्ही पायाचा चेंदामेंदा झाला. या अपघातात शेतकरी विजय गवळी यांचे दोन्ही पाय पूर्णतः निकामी झाले असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे अपघातास कारणीभूत असलेला ट्रॅक्टर चालक अरुण तुकाराम झाडे राहणार सिंदी (रेल्वे) याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी तक्रार भारती विजय गवळी यांनी सिंदी पोलिसांकडे केली आहे.
याबाबत भारती विजय गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार भारती विजय गवळी यांची शेती सिंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजा परसोडी शिवारात आहे. दिनांक 1/11/2023 रोजी गवळी यांच्या शेतामध्ये सिंदी येथील अरुण तुकाराम झाडे यांचा ट्रॅक्टर रोटावेटर करण्यासाठी किरायाने सांगितला होता. त्यामुळे अंदाजे 11 वाजताच्या सुमारास झाडे यांचा ट्रॅक्टर शेतात आला. झाडे यांनी शेतामध्ये थोडेफार रोटावेटर सुद्धा केले होते. दरम्यान, रोटावेटर बरोबर होत नसल्याबाबत शेतकरी विजय गवळी यांनी हटकले. त्यावर झाडे यांनी रोटावेटर बरोबर होत नसेल तर तू स्वतः टॅपलिंग कसून दे, असे म्हटले. परंतु, गवळी यांनी टॅपलिंग कसण्यास नकार दिला. त्यावर झाडे यांनी गवळी यांना जबरदस्तीने टॅपलिंग कसायला लावले. दरम्यान, टॅपलिंग कसत असतानाच ट्रॅक्टर चालक झाडे याचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर सुरू झाला. त्यामुळे रोटावेटर अचानक सुरू झाल्याने शेतकरी रोटरच्या खाली आला. यामध्ये गवळी यांचा डावा पाय सापडला व क्षणातच दुसरा पायही रोटरमध्ये सापडला. त्यामुळे डावा पाय व उजव्या पायाच्या टाकाजवळ हड्डी मोडली तसेच मांडीजवळचीही हड्डी मोडून उजवा पाय रोटरमध्ये चेंदामेंदा झाला. रक्तबंबाळ होऊन शेतकरी ओरडत होता. त्यानंतर झाडे यांनी ट्रॅक्टर थांबवुन काहीवेळाने झाडे यांनी गवळी यांना खाजगी वाहनाने शिवरटेक हॉस्पिटल, नागपूर (धंतोली) येथे भर्ती केले. परंतु, ट्रॅक्टर चालक अरुण झाडे यांनी गवळी यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भर्ती करताच तेथून पळ काढला.
शिवरटेक हॉस्पिटलमध्ये सात दिवस उपचार घेऊन भारती गवळी यांनी ओम हॉस्पिटल रामदासपेठ नागपूर येथे उपचारासाठी भर्ती केले. तेथे 21 दिवस उपचार घेऊन गवळी यांना सुट्टी मिळाली. या दरम्यान उपचारासाठी गवळी यांना अंदाजे जवळपास पाच लाख रुपये खर्च आला. या गंभीर अपघातात शेतकरी विजय गवळी यांचे दोन्ही पाय पूर्णतः निकामी झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. भारती गवळी यांचे पती उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये असल्याने गवळी कुटुंब पोलीस स्टेशन सिंदी येथे तक्रार देऊ शकली नाही. त्यामुळे हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाल्यानंतर ट्रॅक्टर चालक अरुण झाडे यांनी ट्रॅक्टर सुरू असताना जबरदस्तीने रोटावेटरची टॅपलिंग कसायला लावल्यानेच हा गंभीर अपघात झाला. त्यामुळे या अपघाताला दोषी असलेला ट्रॅक्टर चालक अरुण झाडे यांच्यावर कठोर कारवाई अशी तक्रार भारती गवळी यांनी सिंदी पोलिसांकडे केली आहे.
दिनेश घोडमारे साहसिक न्यूज /24 सिंदी रेल्वे