अमरावती शिक्षक मतदारसंघ: संस्थेची पाठफिरव अन् यवतमाळचा धक्का; काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता,’उबाठा’चे पारडे जड

0

🔥अमरावती शिक्षक मतदारसंघ: संस्थेची पाठफिरव अन् यवतमाळचा धक्का; काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता,’उबाठा’चे पारडे जड

🔥काँग्रेसच्या परंपरागत बालेकिल्ल्याला खिंडार; अमरावतीत मविआतील अंतर्गत संघर्षाने शिक्षक निवडणुकीची गणिते बदलली

​वर्धा -/ ​अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महाविकास आघाडीतील अंतर्गत चुरस आता टोकाला पोहोचली आहे. अर्ज छाननीअंती रिंगणात ३० उमेदवार वैध ठरले असले, तरी खरी लढत काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या मित्रपक्षांतच रंगताना दिसत आहे. एकेकाळी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी अमरावतीची मोठी शैक्षणिक संस्था यंदा थेट ‘उबाठा’ गटाच्या गोटात दाखल झाल्याने काँग्रेसच्या उमेदवाराला मोठा सुरुंग लागला आहे. त्यातच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या अनपेक्षित कौलामुळे काँग्रेसची चिंता अधिक वाढली असून मतदारांची मोट बांधताना उमेदवाराची दमछाक होत आहे. पश्चिम विदर्भाचे लक्ष लागून राहिलेल्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणांनी अचानक वेगळे वळण घेतले आहे. अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिंगणात ३० उमेदवार अधिकृतरीत्या शपथा घेऊन मैदानात उतरले आहेत. शिक्षक आणि पदवीधर मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी, संस्थाचालकांशी बैठका आणि पदयात्रांनी प्रचाराचा ज्वर चढवला आहे. मात्र, या चुरशीत सर्वात मोठा राजकीय धक्का काँग्रेस पक्षाला बसताना दिसत असून, पारंपरिक मतपेढीवर निर्माण झालेली पकड सैल होत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

​अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या इतिहासावर नजर टाकल्यास येथील एका मातब्बर आणि व्यापक जाळे असलेल्या शैक्षणिक संस्थेने काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्यात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली होती. ही संस्था काँग्रेसचा अभेद्य गड मानली जात होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत राजकीय वाऱ्याची दिशा बदलली असून या संस्थेने थेट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवाराला उघड पाठिंबा दिल्याची चर्चा आहे.

​संस्थेच्या या भूमिकेमुळे काँग्रेसच्या उमेदवार अदिती ऋषिकेश पोहरे यांच्या प्रचाराला सुरुंग लागला आहे. ऐन मोक्याच्या क्षणी हक्काची मानली जाणारी यंत्रणा हातातून निसटल्याने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता पसरली असून प्रचार मोहिमेत मोठे विघ्न निर्माण झाले आहे.​काँग्रेसपुढील अडचणी केवळ अमरावती शहरापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मतदारांचा कौल प्रस्थापित राजकीय समीकरणांच्या पूर्णपणे विरोधात गेला होता. त्या निकालाचा धसका काँग्रेसच्या गोटात अद्याप कायम आहे. शिक्षक आणि सुशिक्षित मतदार कोणत्याही एका पक्षाच्या दावणीला बांधलेला नसतो, हे बँकेच्या निकालाने अधोरेखित केले होते. त्यामुळे पदवीधर व शिक्षक मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना आणि उमेदवाराला सध्या तारेवरची कसरत करावी लागत आहे. अंतर्गत नाराजी दूर करत मतदारांचा विश्वास संपादन करण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर उभे ठाकले आहे.

​दुसरीकडे, महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरला आहे. वणीचे ‘उबाठा’ गटाचे आमदार संजय देरकर यांनी निवडणुकीत आघाडी घेतली असून ते मित्रपक्षांच्या आमदारांची भेट घेऊन आपल्या पक्षाचे उमेदवार दत्तात्रय श्रीराम लहाने हेच कसे सक्षम आणि विजयासाठी भक्कम पर्याय आहेत, याचे राजकीय गणित पटवून देत आहेत. स्थानिक पातळीवर संघटनात्मक ताकद आणि संस्थाचालकांचे मिळालेले पाठबळ यामुळे ‘उबाठा’चा उमेदवार सध्या मतदारांच्या पसंतीक्रमात आघाडीवर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मित्रपक्षाकडूनच सुरू असलेल्या या पद्धतशीर मोर्चेबांधणीमुळे काँग्रेसचा उमेदवार बॅकफूटवर गेल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

​निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या छाननीअंती एकूण ३० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. रिंगणात प्रमुख पक्षांसह मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवार असल्याने पहिल्या पसंतीच्या मतांचे विभाजन अटळ मानले जात आहे. ​पक्षीय उमेदवार: अदिती ऋषिकेश पोहरे (काँग्रेस), किरणराव रामराव सरनाईक (शिवसेना), दत्तात्रय श्रीराम लहाने (शिवसेना उबाठा), प्रा. अनिल मधुकरराव काळे (बळीराजा पार्टी), गजानन गोविंदराव ढोके (भारतीय जनसम्राट पार्टी), प्रिती हर्षल रेवणे (राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी), सुरेश बाबुराव देवकर (समाजवादी गणराज्य पार्टी).

​अपक्ष उमेदवार: अविनाश मधुकर बोर्डे, अशोक वामन हिवाळे, आशिष मनोहर अंबुलकर, उपेंद्र बाबाराव पाटील, किरण अर्जून चौधरी, किरण अर्जून पवार, गजानन रामचंद्र उल्हे, दिलीप भिमराव कडू, नितीन सुभाषराव आगे, डॉ. प्रशांत विश्वेश्वर विघे, चंद्रशेखर उर्फ शेखर मनोहरराव भोयर, मिलिंद तुकाराम ब्राह्मणे, राजेशकुमार शालिग्राम कड, रामदास संपतराव कटक, विनोद प्रल्हाद कडू, श्रीकांत गोविंद देशपांडे, श्रीकृष्ण सुर्यभान पहुरकर, सजील खान खलील खान, सुनील दुर्गादास राठोड, सुमित सुरेशराव पवार, डॉ. संगीता सचिंद्र शिंदे-बोंडे, प्रा. डॉ. संतोष श्रीकृष्ण हुशे, आणि हेमलता दिलीपसिंग मुणोत.

​सध्या सर्वच ३० उमेदवार शाळा, महाविद्यालये आणि मतदारांच्या घराघरांत जाऊन तळ ठोकून आहेत. मात्र, मित्रपक्षांमधील ही थेट चुरस आणि पारंपरिक बालेकिल्ल्याला गेलेले तडे पाहता अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेसची वाट अत्यंत खडतर झाली असून निवडणुकीचा अंतिम निकाल कोणत्या वळणावर जातो, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे…………(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!