आर्णीत महसूल, पोलीस आणि वनविभागाच्या ‘आशीर्वादाने’ गौण खनिजाची लूट,पैनगंगेचे पात्र रक्ताने माखणार?

0

🔥हाच तो रेती व मुरूम चोराचा सरदार तहसीलदार वैशाख वाहुरवाग.🔥हेच ते आर्णीत महसूल, पोलीस आणि वनविभागाच्या ‘आशीर्वादाने’ गौण खनिजाची लूट,पैनगंगेचे पात्र रक्ताने माखणार?                                                                             🔥​भ्रष्ट अधिकाऱ्यांची उचलबांगडी होणार का?🔥​हेच ते पैनगंगेच्या पात्रात धुडगूस घालणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जाणार का?🔥​हेच ते चोरीला गेलेल्या रॉयल्टी बुकचे रहस्य उलगडणार का?

🔥​या प्रश्नांची उत्तरे आर्णीतील जनता शोधत आहे. जर वेळीच आवर घातला नाही, तर भविष्यात येथे मोठ्या रक्‍तपाताची शक्यता नाकारता येत नाही.

यवतमाळ -/ एकीकडे सरकार पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या बाता मारत असताना, दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात प्रशासन आणि वाळू तस्करांच्या अभद्र युतीमुळे निसर्गाचा मोठा ऱ्हास सुरू आहे. आर्णी तालुक्यात सध्या ‘ज्याला कुणी नाही वाली, त्याचे प्रशासनच झाले साली’ अशी स्थिती निर्माण झाली असून, तहसीलदार, पोलीस प्रशासन आणि वनविभागाच्या संगमताने गौण खनिजाची चोरी आता उच्चांकावर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेत लोकप्रतिनिधींचा ‘वरदहस्त’ असल्याने सामान्यांचा आवाज दाबला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

​आर्णी तालुक्यातील जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पैनगंगा नदीचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे. नदीचे संपूर्ण वाळू घाट कुख्यात गुन्हेगारांनी ताब्यात घेतले आहेत. या तस्करांनी केवळ नदीचे पात्र पोखरले नाही, तर कायद्याची भीतीही संपवून टाकली आहे. जर एखादा सजग नागरिक किंवा शेतकरी या अवैध उपशाविरुद्ध तक्रार करण्यास गेला, तर त्याला “थेट खून करू” अशी धमकी दिली जात आहे. तस्करांची ही ‘भाईगिरी’ प्रशासनाच्या डोळ्यादेखत सुरू आहे, मात्र पोलीस यंत्रणा मूग गिळून गप्प बसली आहे.

​तस्करांनी आपली दादागिरी सिद्ध करण्यासाठी चक्क पैनगंगा नदीचे पाणी अडवून पात्रात मोठमोठी अजस्र वाहने उभी केली आहेत. दिवस-रात्र आयता, बिलायता, जंलाद्री १, जंलाद्री २ आणि रत्नापूर या घाटांवरून अवैध उपसा सुरू आहे. पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून पोकलेन आणि जेसीबीच्या साहाय्याने नदीचे काळीज फाडले जात आहे.

​सर्वात संतापजनक बाब म्हणजे, उपसा केलेली वाळू वाहून नेण्यासाठी दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्रातून चक्क रस्ता तयार करण्यात आला आहे. भारतीय वन कायद्यानुसार, राखीव वनक्षेत्रातून रस्ता तयार करणे किंवा तिथून जड वाहनांची वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. मात्र, आयता आणि बिलायता घाटावरून निघणारी ओव्हरलोड वाळूची वाहने दररोज वनवर्तुळातून सर्रास धावत आहेत. वनविभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने, “वनरक्षक की तस्कर रक्षक?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.

​प्रशासकीय अनागोंदीचा कळस म्हणजे, काही दिवसांपूर्वी तहसीलदार वाहुरवाघ यांच्या दालनातून चक्क ‘रॉयल्टी बुक’ चोरीला गेल्याची बाब उघडकीस आली होती. सरकारी दस्तऐवज चोरीला जाणे ही गंभीर बाब असतानाही, तहसीलदारांनी राजकीय दबावापोटी किंवा वरदहस्तामुळे कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई केली नाही. अवैध उत्खनन जोरात सुरू असताना प्रशासनाकडून एकही कारवाई न होणे, हे या भ्रष्टाचाराच्या साखळीवर शिक्कामोर्तब करणारे आहे.

​आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश सुरवडकर हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कर्तव्यदक्ष राहून गुन्हेगारांवर वचक बसवण्याऐवजी, ते केवळ ‘हप्तेखोरीत’ अडकले असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. आर्णी मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम यांच्या सांगण्यावरूनच सर्व कारभार चालत असून, ठाणेदार हे लोकप्रतिनिधींच्या हातातील ‘बाहुले’ बनले आहेत, असा थेट आरोप नागरिक करत आहेत. वर्दीची शान सोडून आमदारांची ‘जी हुजुरी’ करण्यातच पोलीस यंत्रणा धन्यता मानत आहे. ​केवळ वाळूच नव्हे, तर तालुक्यातील ईक्लास (शासकीय) जमिनींवरून मोठ्या प्रमाणात माती आणि मुरूमाचे अवैध खनन करून वाहतूक केली जात आहे. सरकारी मालमत्तेची ही लूट राजरोसपणे सुरू असून महसूल विभागाचे कर्मचारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.

​आर्णी तालुक्यात भ्रष्टाचाराचे हे ‘कुरण’ आता लोकशाहीला काळिमा फासणारे ठरत आहे. प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते यांच्या अभद्र युतीमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. आता जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी विकास मीना यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.(क्रमशः)

         ब्युरो रिपोर्ट साहसिक                     -/ News 24 यवतमाळ 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!