🔥स्टॅम्प पेपरचा वापर वादात! कारवाई कोणाची — मुद्रांक की पोलीस?
(गजानन ढाकुलकर) हिंगणा -/ कोतेवाडा सुमठाना गट ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी वाढदिवसा निमित्त नागरिकांचे आभार व्यक्त करण्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा वापर केल्याचा प्रकार समोर आला असून, यावर आता कायदेशीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. Indian Stamp Act, 1899 नुसार स्टॅम्प पेपरचा वापर प्रामुख्याने करार, प्रतिज्ञापत्र व अधिकृत व्यवहारांसाठीच अपेक्षित असतो. त्यामुळे वैयक्तिक संदेशासाठी अशा कागदाचा वापर योग्य आहे का, याची चौकशी होणे आवश्यक मानले जात आहे.
कायदा तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या प्रकरणात प्राथमिक अधिकार मुद्रांक विभागाचा असून, जिल्हा मुद्रांक अधिकारी किंवा उपनिबंधक यांच्याकडून चौकशी करून दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. मात्र, जर या वापरातून फसवणूक, चुकीचा फायदा किंवा सरकारी कागदाचा जाणूनबुजून गैरवापर झाल्याचे आढळले, तर Indian Penal Code अंतर्गत गुन्हा नोंदवून पोलीस कारवाईची शक्यता देखील नाकारता येत नाही.
सध्या या प्रकरणात प्रथमदर्शनी मुद्रांक विभागाची चौकशी अपेक्षित असून, त्यानंतरच पुढील कायदेशीर पावले ठरणार आहेत. त्यामुळे “कायद्याचा कागद की वैयक्तिक वापर?” हा प्रश्न उपस्थित झाला असून, प्रशासनाची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.