आर्थिक विवंचना अन् धमक्यांच्या तणावातून प्रशांतची जीवनयात्रा संपली.!

0

🔥 मृतक प्रशांत ढोबळे🔥आरोपी अमोल शेंडे🔥आरोपी मोनिका शेंडे

🔥आर्थिक विवंचना अन् धमक्यांच्या तणावातून प्रशांतची जीवनयात्रा संपली.!

🔥सुसाईड नोटच्या आधारे सेलूतील दाम्पत्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा; दोघांना अटक, न्यायालयीन कोठडी

सेलू -/ आर्थिक विवंचना, पैशांचा तगादा आणि खोट्या प्रकरणात अडकविण्याच्या धमक्या… या सगळ्या परिस्थितीला कंटाळून घोराड येथील ३८ वर्षीय प्रशांत भोजराज ढोबळे यांनी रविवारी रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले असून, मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी सेलू येथील भंगार व्यावसायिक अमोल प्रल्हादराव शेंडे (वय ४२) आणि त्यांची पत्नी मोनिका अमोल शेंडे (वय २९) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास प्रशांत यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. सोमवारी सकाळी त्यांची मुलगी आणि भावाची पत्नी घरी आल्या असता ही घटना उघडकीस आली. गेल्या काही दिवसांपासून प्रशांत आर्थिक विवंचनेत असल्याची माहिती कुटुंबियांकडून समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ही नोट पोलिसांच्या हाती लागल्यानंतर तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेलूच्या जोशीनगर येथील अमोल शेंडे आणि त्यांची पत्नी मोनिका यांच्याकडे प्रशांत यांचे पाच लाख रुपये तसेच सोन्याचे दागिने असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. प्रशांत हे वारंवार संबंधित दाम्पत्याकडे आपली रोख रक्कम आणि दागिने परत मागत होते. मात्र, त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. उलट, मोनिका शेंडे यांच्याकडून खोट्या प्रकरणात अडकविण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये करण्यात आल्याची माहिती आहे. या आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या तणावातून प्रशांत यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक तपासाचा निष्कर्ष आहे.

🔥वर्षभरात आई-वडिलांचे छत्र हरपले.!

या घटनेने प्रशांत यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वर्षभरापूर्वीच त्यांच्या पत्नीचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर आता वडिलांनीही जगाचा निरोप घेतल्याने त्यांच्या एकुलत्या एक मुलीच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. आधीच मातृछत्र हरविलेल्या चिमुरडीला आता पितृछत्रही गमवावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

🔥दाम्पत्याला अटक; न्यायालयीन कोठडी.!

सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी अमोल आणि मोनिका शेंडे या दाम्पत्याविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सोमवारी रात्रीच अमोल शेंडे यांना, तर मंगळवारी सकाळी मोनिका शेंडे यांना ताब्यात घेतले. मंगळवारी दुपारी दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. तपासासाठी पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाने दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार पंकज वाघोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल नल्लावार आणि नितीन डाखोळे करीत आहेत.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 सेलू,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!