खाकीची लक्तरे वेशीवर; रेती माफियांपुढे बाभुळगावचे ठाणेदार नतमस्तक!

0

🔥हाच तो बाभुळगाव चा रेती माफिया राहील शेख हा तत्कालीन ठानेदार तावरे व आता दिपमाला भेंडे यांना आपल्या इशारया वर नाचविणारा


🔥हेच ते बाभुळगाव चे ठाणेदार लहू तावरे रेती माफिया राहील शेख चे बनले गुलाम

🔥खाकीची लक्तरे वेशीवर; रेती माफियांपुढे बाभुळगावचे ठाणेदार नतमस्तक!

🔥“भावा, फक्त २०० रुपयांची पावती फाडू…”; तस्करांची विनवणी करणारी ठाणेदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल!

​​यवतमाळ -/ एकीकडे संपूर्ण जिल्हा भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असताना, दुसरीकडे गौण खनिज आणि रेती माफियांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अवैध रेती तस्करीविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले असतानाच, यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव येथील तत्कालीन ठाणेदार लहु तावरे यांची एक धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. रस्त्यात अडथळा निर्माण करणाऱ्या तस्कराच्या वाहनावर कडक कारवाई करण्याऐवजी, संबंधित ठाणेदाराने चक्क ‘भावा’ म्हणत तस्कराची गयावया केल्याचे या संभाषणातून उघड झाले आहे. कायद्याचा धाक दाखवण्याऐवजी “फक्त २०० रुपयांची साधी पावती फाडून प्रकरण मिटवू,” अशी तडजोड करणाऱ्या या संभाषणामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यात एकीकडे पाण्यासाठी आणि चाऱ्यासाठी नागरिकांची वणवण सुरू असताना, दुसरीकडे नदीपात्रांचे लचके तोडणाऱ्या रेती तस्करांना पोलिसांचेच अभय मिळत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. बाभुळगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार लहु तावरे आणि ‘राहिल’ नावाच्या एका व्यक्तीमधील कथित फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या संभाषणातून पोलीस प्रशासन रेती माफियांपुढे कसे हतबल आणि नतमस्तक झाले आहे, याचे विदारक चित्र समोर आले असून खाकी वर्दीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

सदर ऑडिओ क्लिपमध्ये सुरुवातीला कोणीतरी फोन लावून “साहेबांशी बोल” असे सांगते. त्यानंतर ठाणेदार लहु तावरे हे समोरील व्यक्तीला म्हणजेच ‘राहिल’ला अत्यंत मवाळ भाषेत समजावताना ऐकू येतात. गावातील रस्त्यावर लावलेल्या वाहनाबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्याचे ठाणेदार सांगतात. यावर राहिल हा अत्यंत आक्रमक आणि उद्धट स्वरात ठाणेदारालाच प्रत्युत्तर देतो. “मी तुम्हाला सकाळपासून सांगतोय, तुम्ही माझे ऐकले नाही आणि मला काहीतरी करायला मजबूर केले. माझे बॅनर फाडले गेले, गावात माझाही मानसन्मान आहे. मी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत गाडी हटवतो, तुम्ही तिथून निघून जा,” अशी अरेरावी राहिल करतो.

सामान्य नागरिकांवर कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस या संभाषणात मात्र एका तस्करासमोर पूर्णपणे झुकल्याचे दिसून येते. राहिलच्या अरेरावीनंतरही ठाणेदार तावरे त्याला “अरे भावा, माझी गोष्ट ऐक, मला अर्ध्या तासात गाडीची चावी पाठवून दे, तुला काहीही त्रास होणार नाही, माझ्यावर विश्वास आहे ना?” अशी विनवणी करताना ऐकू येतात. एवढेच नव्हे, तर “तुझे काम कायदेशीर नाहीये ना, म्हणूनच मी तुला समजावून सांगतोय,” असे म्हणत तस्कराच्या बेकायदेशीर कृत्याची कबुली देऊनही त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न ठाणेदाराकडून होताना दिसतो. वरिष्ठांचा किंवा नागरिकांचा दबाव असल्यामुळे केवळ औपचारिकता म्हणून कारवाई करण्याचा मार्ग ठाणेदारानेच तस्कराला सुचवला. “मी इथे आलो आहे, तर यावर काहीतरी सामान्य कारवाई करावीच लागते ना. तुझ्या गाडीत रेती नाही, रिकामीच गाडी आहे ना? मग जास्तीत जास्त रस्त्यावर रहदारीला अडथळा निर्माण केल्याची कारवाई करू. ती केस लोकअदालतीत जाईल आणि अवघ्या २०० ते २५० रुपयांचा दंड भरून गाडी सुटेल,” असा कायद्यातील पळवाटांचा सल्ला खुद्द ठाणेदाराने दिला. इतकेच नाही तर, मूळ आरोपीला वाचवण्यासाठी दुसऱ्या कोणाचे तरी नाव आणि कागदपत्रे देण्यासही ठाणेदाराने सांगितले. त्यानुसार राहिलने त्याचा लहान भाऊ ‘शेख राजिक शेख युनूस’ याचे नाव पुढे केले आणि त्याचे आधार कार्ड व्हॉट्सॲपवर पाठवून गाडी बाजूला करण्याचे ठरले.

राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात शून्य सहनशीलतेचे (झिरो टॉलरन्स) धोरण अवलंबण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. कोणत्याही तस्कराची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, बाभुळगाव येथील या प्रकारामुळे पालकमंत्र्यांच्या आदेशाला स्थानिक पोलीस प्रशासनानेच केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट होत आहे. एका बाजूला दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असताना, दुसरीकडे माफियांशी हातमिळवणी करून ‘सेटिंग’ लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर गृहविभाग आणि पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 बाभुळगाव,यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!