🔥गुटखा किंग कुमार ओछाणीचे ‘आर्णी कनेक्शन’ तस्कराच्या खोट्या जबाबावरून तीन निष्पाप पोलिसांचे निलंबन.
यवतमाळ -/ जिल्ह्याला लागलेला गुटखा तस्करीचा विळखा आता अधिक गडद आणि भयानक बनत चालला आहे. स्थानिक सिंधी कॅम्प पळसवाडी परिसरात अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून तब्बल २६ लाख ६३ हजार ५३९ रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पानमसाला जप्त केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या मोठ्या कारवाईपेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे, यवतमाळमधील गुटखा तस्करीत स्वतःचे एकछत्री साम्राज्य निर्माण करण्यासाठी मुख्य आरोपी आणि कुख्यात गुटखा तस्कर कुमार रामचंद्र ओछाणी याने रचलेला चक्रव्यूह आता समोर आला आहे. स्वतःचा काळा धंदा निर्धास्तपणे चालवण्यासाठी ओछाणी याने तीन निष्पाप पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध चक्क खोटा जवाब दाखल करून त्यांचे निलंबन घडवून आणल्याचे उघड झाले असून, या अन्यायकारक कारवाईमुळे पोलीस दलात तीव्र असंतोष पसरला आहे.
महाराष्ट्र शासनाने मानवी आरोग्याला कमालीचा अपायकारक असलेला सुगंधित तंबाखू आणि पानमसाला विक्री व वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. असे असतानाही, यवतमाळच्या पळसवाडी परिसरात एका स्विफ्ट डिझायर कारमधून (क्र. किंमत ६ लाख रुपये) या प्रतिबंधित मालाची अवैध वाहतूक केली जात होती. अन्न सुरक्षा अधिकारी जगदीश पंढरीनाथ कापसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळावरून तब्बल १००५.३८ किलो घातक तंबाखू आणि सीलिंग पॅकिंग मशीन असा एकूण २६ लाख ६३ हजार ५३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलिसांनी अलीम सलीम बेग उर्फ सोनू (रा. बाभुळगाव) आणि मुख्य सूत्रधार कुमार रामचंद्र ओछानी (रा. यवतमाळ) यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अलीम सलीम बेग उर्फ सोनू याला पोलिसांनी बेड्या ठोकत त्याची कारागृहात रवानगी केली आहे. मात्र, या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाईंड असलेला कुमार ओछाणी हा सध्या पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला आहे. कायदेशीर कारवाईच्या कचाट्यातून वाचण्यासाठी तो सध्या न्यायालयातून जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत असल्याची खात्रीशीर माहिती आहे. या प्रकरणातील अत्यंत संतापजनक आणि गंभीर बाब म्हणजे, कुख्यात गुटखा तस्कर कुमार ओछाणी याने यवतमाळ जिल्ह्यात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनाच बळीचा बकरा बनवले. ओछाणी याच्या काळ्या धंद्याला आणि त्याच्या अरेरावीला जे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आडवे येत होते, त्यांना वाटेतून हटवण्यासाठी त्याने एक पद्धतशीर कट रचला. ओछाणी याने स्वतःच्या गुन्हेगारी प्रभावाचा वापर करून पोलीस दलातील बबलू पठाण, अविनाश ढोणे यांच्यासह आणखी एका अशा एकूण तीन निष्पाप पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध अत्यंत खोटा आणि बनावट जवाब दाखल केला. एका गुन्हेगाराच्या, तस्कराच्या बयानाला किंवा जबाबाची शहानिशा न करता, थेट वरिष्ठ पातळीवरून या तीन निष्पाप पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले.
एका गुटखा तस्कराच्या सांगण्यावरून आणि खोट्या आरोपांवरून प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचे निलंबन होणे, हा पोलीस दलाच्या मनोधैर्यावर घाला घालणारा अत्यंत अन्यायकारक प्रकार आहे. गुटखा किंगने स्वतःचे साम्राज्य वाचवण्यासाठी आणि पोलिसांवर वचक निर्माण करण्यासाठी हा ‘गेम’ खेळल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
कुमार ओछाणी हा केवळ यवतमाळपुरता मर्यादित नसून त्याचे जाळे संपूर्ण जिल्ह्यात पसरले आहे. आर्णी येथील मेहबुब नामक दुसऱ्या एका मोठ्या गुटखा तस्कराशी ओछाणीचे ‘सुमधुर आणि व्यावसायिक संबंध’ आहेत. या दोन बड्या तस्करांनी संगनमत करून संपूर्ण जिल्ह्यात गुटखा पुरवठ्याची समांतर यंत्रणा उभी केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार, सध्या या तस्करांचे मुख्य गोडाऊन ‘अकोला बाजार’ परिसरात असून, याच गोदामातून दररोज लाखो रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि गुटखा संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात छुप्या मार्गाने सप्लाय केला जातो. अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी केवळ पळसवाडीतील कारवाईवर न थांबता, अकोला बाजार येथील मुख्य गोदामावर धाड टाकून या आंतर-जिल्हा रॅकेटचा बिमोड करण्याची अत्यंत गरज आहे. गुन्हेगारांच्या खोट्या तक्रारींवरून जर खाकी वर्दीवरच कारवाई होणार असेल, तर तस्करांचे मनोबल वाढणार यात शंका नाही. बबलू पठाण, अविनाश ढोणे व त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेले निलंबन हे निव्वळ एका कुख्यात तस्कराच्या कुटिल कारस्थानाचा भाग होते, हे आता संपूर्ण जिल्ह्यासमोर आले आहे. त्यामुळे यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची पुनर्चौकशी करून, त्या फरार ओछाणीच्या खोट्या जबाबाचा पर्दाफाश करावा आणि त्या तीनही निष्पाप पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन तात्काळ मागे घेऊन त्यांना सन्मानाने सेवेत परत घ्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
तसेच, फरार असलेला गुटखा किंग कुमार ओछाणी याला अटक करणे आणि अकोला बाजार येथील मेहबुबचे नेटवर्क उद्ध्वस्त करणे हे यवतमाळ पोलिसांसमोर आता मोठे आव्हान आहे.