🔥गुटखा तस्कर कुमार ओछाणीला ‘मोक्का’च्या प्रस्तावानंतरही अटक नाही..१० लाखांच्या कथित ‘डिल’ची पोलीस वर्तुळात चर्चा! स्थानिक गुन्हे शाखेची भूमिकेवर संशय,
(विशेष प्रतिनिधी) यवतमाळ -/ विदर्भातील प्रतिबंधित गुटखा तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कुख्यात गुटखा तस्कर कुमार अशोक ओछाणी याच्याविरुद्ध अत्यंत कडक मानल्या जाणाऱ्या ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडे पाठवला आहे. मात्र, हा प्रस्ताव सादर होऊन एक आठवड्यापेक्षा जास्त काळ उलटला तरी पोलीस प्रशासनाने आरोपी कुमार ओछाणी याला अटक केलेली नाही. त्यामुळे एफडीएच्या या अत्यंत महत्त्वाच्या प्रस्तावाला पोलीस प्रशासन खरोखरच मंजुरी देणार की हा गुन्हा थंड बस्त्यात टाकणार, असा तीव्र संशय आता निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात खाकी वर्दीतील काही घटकांची भूमिका अत्यंत संशयास्पद ठरत असून, आरोपीला अटक न करण्यासाठी आणि त्याला न्यायालयातून सहज जामीन मिळवून देण्यासाठी तब्बल १० लाख रुपयांची ‘पहिली डिल’ झाल्याची खळबळजनक चर्चा सध्या पोलीस वर्तुळात रंगली आहे. सुरुवातीला या हाय-प्रोफाइल गुन्ह्याचा तपास शहर पोलिसांकडे सोपवण्यात आला होता. मात्र, तपास संथ गतीने सुरू असल्याच्या आरोपांनंतर अवघ्या दोन दिवसांपूर्वी हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणात आक्रमक कारवाईची अपेक्षा होती. मात्र, ‘एलसीबी’चे पोलीस निरीक्षक सतीश चवरे हे या संवेदनशील गुन्ह्याबाबत कमालीची उदासीनता आणि असंवेदनशीलता दाखवत असल्याचे दिसून येत आहे. कर्तव्यदक्ष आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी गुटखा तस्करांवर कडक कारवाईचे थेट आदेश दिले होते. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने आयुक्तांच्या या आदेशांना थेट केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे. अमरावतीचा मुख्य गुटखा किंग जावेद सुपारीवाला याच्या राजकीय व आर्थिक दबावापुढे एलसीबी नतमस्तक झाली आहे की काय, असा स्पष्ट संशय आता जनमानसात आणि पोलीस दलात निर्माण झाला आहे.
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, कुमार अशोक ओछाणी हा स्वतंत्र तस्कर नसून तो अमरावती येथील कुख्यात गुटखा माफिया जावेद सुपारीवाला आणि त्याचा साथीदार अमित कल्याण यांचा मुख्य हस्तक आहे. जावेद सुपारीवाला याच्याकडून बाजीराव, नजर आणि इतर नामांकित कंपन्यांचा लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आयात करून तो संपूर्ण विदर्भात बेकायदेशीरपणे पुरवण्याचे मोठे रॅकेट ओछाणी चालवत होता. विदर्भातील तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या या रॅकेटची पाळेमुळे अत्यंत खोलवर रुजलेली असून, त्याला अमरावती आणि यवतमाळमधील बड्या राजकीय नेत्यांचे वरदहस्त लाभले आहे.
गुटखा तस्करांना मदत केल्याच्या आरोपावरून यापूर्वीच खाकी वर्दीतील तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. या निलंबनानंतर पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली असताना, आरोपी कुमार ओछाणी हा स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि “मी किती चांगला आहे” हे दाखवण्यासाठी काही वरिष्ठ पोलिसांसोबत राजरोसपणे वावरत होता.
याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, पोलीस दलातील एक शिपाई थेट कुमार ओछाणी याच्या गुटखा तस्करीच्या बेकायदेशीर व्यवसायात सक्रिय भागीदार (पार्टनर) असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. हा पोलीस शिपाई आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या भक्कम पाठबळामुळेच ओछाणी पोलिसांना गुंगारा देऊन बिनधास्तपणे फिरत आहे. गुन्हेगारांचे थेट पोलिसांसोबत असलेले हे साटेलोटे जिल्हा पोलीस दलासाठी अत्यंत लज्जास्पद मानले जात आहे.गुन्हेगारांचा बिमोड करणे आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे ही स्थानिक गुन्हे शाखेची मुख्य जबाबदारी आहे. मात्र, सध्या ही महत्त्वाची शाखा गुन्हेगारांना जेरबंद करण्याऐवजी केवळ ‘वसुली’मध्ये आपले नशीब आजमावत असल्याचे विदारक चित्र आहे. जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणून (बर्किंग करून) केवळ काळा पैसा आणि माया गोळा करण्यातच काही अधिकारी व्यस्त असल्याचा आरोप होत आहे.
अमरावतीचा मुख्य तस्कर जावेद सुपारीवाला याचा खास हस्तक असलेल्या कुमार ओछाणीला अटक का केली जात नाही? हा प्रश्न आता जिल्हा पोलीस दलातच अंतर्गत वादाचा आणि चर्चेचा विषय बनला आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
अन्न व औषध प्रशासनाने पाठवलेला मोक्काचा प्रस्ताव धुडकावून लावण्यासाठी आणि गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी पडद्यामागून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार सुरू असल्याचा संशय बळावला आहे. आयुक्त तुकाराम मुंडे आता आपल्या आदेशाचा अवमान करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात आणि मुख्य तस्कर जावेद सुपारीवाला व कुमार ओछाणी यांच्या मुसक्या कधी आवळतात, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे. जर या प्रकरणात तातडीने कठोर पावले उचलली गेली नाहीत, तर गुटखा माफियांचे मनोधैर्य आणखी वाढेल आणि खाकी वर्दीवरील जनतेचा विश्वास पूर्णपणे उडेल, हे मात्र नक्की!(क्रमशः)