टोलनाक्यावर बनावट पावत्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल
Byसाहसिक न्यूज24
मुक्ताईनगर/ पंकज तायडे:
वाहनधारकांना टोल नाक्यावर बनावट पावत्या देत फसवणूक केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिस स्टेशनला अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे या प्रकरणी फिर्यादी झाले आहेत. टोल नाक्यावरील जनरल मॅनेजर सेहवाल समशेर खान, अकाऊंटंट शिवदत्त पारीख, प्रदीप यादव, संतोष तिवारी, सिताराम यादव, शमीम खान, सवाईसिंग अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा.द.वि. कलम 420, 465, 471, 120(ब) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी या बनावट पावत्यांसह फसवणूकीचा भंडाफोड केल्यानंतर या टोल नाक्यावरील गैर प्रकार उघडकीस आला. न्हाई चे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा अथवा त्यांचा कुणीही सहकारी या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यास पुढे आला नाही. याबाबत अखेर पर्यंत सिन्हा यांनी फिर्याद दाखल करण्यास सारस्य दाखवले नाही. न्हाई चे प्रादेशिक अधिकारी राजीव अग्रवाल यांनी जळगावला येवून ज्याने तक्रार केली त्यानेच फिर्यादी व्हावे असे सांगून आपली जबाबदारी झटकल्याचे म्हटले जात होते. बराच काथ्याकुट झाल्यानंतर याप्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे.
नशिराबाद टोल प्लाझावरील ठेकेदार, जनरल मॅनेजर, अकाऊंटंट यांनी संगनमताने कट रचून टोल नाक्यावर न्हाईच्या सर्व्हर सोबत जोडणी न केलेल्या हॅंड मशिनचा वापर करुन न्हाईने पुरवलेल्या मशीनमधून येणा-या पावतीसारखी दिसणारी मिळतीजुळती बनावट पावती वाहनधारकांना देवून त्यातून येणारा महसुल स्वत:च्या फायद्यासाठी ठेवून घेतल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. शासनला कमी महसुल जमा झाल्याचे दाखवून टोल नाक्याची मुदत वाढावी आणि आपला फायदा होण्याच्या उद्देशाने शासनासह जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक राजेंद्र साळुंखे करत आहेत. अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही.