दलित युवकाला अमानुष मारहाण करून धिंड काढणाऱ्या आरोपींवर कारवाई करा.
🔥 पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा यांना निवेदन सादर.
🔥 मुलींची छेड काढल्यावरून बेदम मारहाण करून काढली होती धिंड
🔥 घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
🔥 पोलीस अधीक्षकांनी दिले चौकशीचे आदेश
सिंदी (रेल्वे) : मुलींची छेड काढत अश्लील चाळे केल्या प्रकरणी आरोपी प्रीतम सहारे याला शिक्षक, पालक तसेच नागरिकांनी अंगावरील कपडे फाटतपर्यंत बेधम मारहाण केली. एवढेच नाही तर त्या आरोपीची शहरातील मुख्य मार्गाने बाजारपेठेतून अर्धनग्न धिंड काढत पोलिसात नेले. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आरोपी प्रीतम सहारे विरुद्ध विनयभंग तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. मात्र, दुसरीकडे पोलिसांनी आरोपीच्या पत्नीची तक्रार नोंदवून अदखलपात्र गुन्ह्याची पावती दिली. परिणामी, सिंदी पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे तक्रार नोंदवली नसल्याने माझ्या पतीला बेधम मारणाऱ्या तसेच धिंड काढणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आरोपीची पत्नी दीपाली प्रीतम सहारे (30) यांनी पोलीस अधीक्षक व पोलीस उपविभागीय अधिकारी वर्धा यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
दीपाली प्रीतम सहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार तिचे कुटुंब दलित असून मागील 12 वर्षांपासून सिंदी शहरात वास्तव्यास आहे. आरोपी हा तिचा पती असून राजकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. दिनांक 29 डिसेंम्बर रोजी दिपालीचा पती प्रीतम हा सकाळी 6 वाजताच्या सुमारास स्टेशनकडे फिरायला गेला होता. त्यानंतर काही वेळाने वार्डातील लोकांनी सांगितले की, तुझ्या पतीला 30-40 जण केसरीमल नगर शाळेत मारत आहे. त्यामुळे दीपालीने तातडीने शाळा गाठली. परंतु, तिथे कोणीही दिसून आले नाही म्हणून ती पोलीस स्टेशनकडे पतीला पाहण्यास निघाली. दरम्यान, रस्त्यात तिच्या पतीला उघडे करून धिंड काढत मारत होते. त्यामुळे त्याच्या शरीरावर व चेहऱ्यावर लाथाभुक्यांचे वर दिसून पडत होते. त्यानंतर लोकांनी आरोपीला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेत त्यांनीही जनतेसमोर हाताने व काठीने मारहाण केली. पोलिसांनी शाळेतील मुलींचे बयान नोंदवून दिपालीच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी दीपाली सहारे यांची तक्रार नोंदवून अदखलपात्र गुन्ह्याची पावती दिली. परंतु, सांगितल्याप्रमाणे सिंदी पोलिसांनी तक्रार नोंदवली नसल्याचे दीपाली सहारे यांचे म्हणणे आहे.
दीपाली व तिचे पती ज्या प्रभागात राहते तिथे त्यांची लोकांमध्ये चांगली उत्तम छबी आहे. समाजामध्ये त्यांची वागणूक चांगली असल्याने 12 वर्षात त्यांच्याविरुद्ध सिंदी पोलिसात कोणतीही तक्रार दाखल नाही. एक महिन्यापासून केसरीमल नगर विद्यालयाच्या मुलींची छेड काढत अश्लील चाळे केल्याचा आरोप प्रीतमवर आहे. परंतु, त्याप्रकरणी मुलींची, पालकांची तसेच शिक्षकांची सिंदी पोलिसात तक्रार नाही. विशेष म्हणजे घटने संदर्भात आरोपीविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नसतांना प्रीतम सहारेला सकाळी स्टेशन परिसरातून प्रदीप कनोजे यांनी पकडून शाळेच्या आवारात आणून कनोजे व नागरिकांनी त्यास अमानुष मारहाण केली. एवढेच नाही तर त्याची शहरात धिंड काढली. या घटनेचा व मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला. परिणामी, माझ्या पतीला मारण्याचा अधिकार कोणी दिला? असा सवाल दीपाली सहारे यांनी विचारला आहे. शहरातील काही गावपुढाऱ्यांनी येणाऱ्या स्थानिक न.प.च्या निवडणुकीवर डोळा ठेवून प्रभागात स्वतःची छबी चमकविण्याकरिता रचलेला कट असल्याचेही दीपाली म्हणाली. परिणामी, आरोपी प्रीतम सहारे यांना अमानुष मारहाण करून त्याची शहरात अर्धनग्न धिंड काढणारे आरोपी खुशाल बोरकर, प्रवीण वाघमारे, विनायक सोनटक्के, राहुल गवळी, गजानन घोडे, अनिल चांदेकर, अमोल गवळी, अनिल साखळे, प्रदीप कनोजे, विजय बीजवार व इतर 30-40 लोकांवर कठोर कारवाई करून अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी दीपाली प्रीतम सहारे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
दिनेश घोडमारे साहसिक न्यूज/24 सिंदी रेल्वे