राळेगावात ३४ मुलींच्या ‘मानवी तस्करी’च्या आरोपावरून राजकीय रणकंदन; मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी.

0

🔥राळेगावात ३४ मुलींच्या ‘मानवी तस्करी’च्या आरोपावरून राजकीय रणकंदन;मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी.

🔥​पोलीस रेकॉर्डवर ३४ मुली गायब नसल्याचा गौप्यस्फोट
सत्ताधाऱ्यांविरोधात २४ एप्रिलला यवतमाळात धडकणार भव्य मोर्चा

​यवतमाळ |प्रतिनिधी यवतमाळ-/ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा मतदारसंघात सध्या ‘मानवी तस्करी’ आणि ‘लव्ह जिहाद’ या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आणि भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चव्हाण यांनी तालुक्यातील ३४ आदिवासी मुलींची तस्करी झाल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर, या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. या आरोपांमुळे राळेगावात सामाजिक तणाव निर्माण झाला असून, आज सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या ॲड. सीमाताई तेलंगे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर गंभीर ताशेरे ओढले आणि मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
काही दिवसांपूर्वी मंत्री डॉ. अशोक उईके आणि ॲड. प्रफुल्ल चव्हाण यांनी जाहीररीत्या आरोप केला होता की, राळेगाव तालुक्यातील ३४ आदिवासी मुलींची मानवी तस्करी करण्यात आली असून त्यांची विक्री झाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ राळेगाव शहर आणि तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, या बंदला हिंसक वळण लागले. शहरात ठिकठिकाणी टायर जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या, ज्यामुळे सर्वसामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वर्षानुवर्षांचा सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे.
​सत्ताधाऱ्यांचे अपयश की राजकीय षडयंत्र? आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ॲड. सीमा तेलंगे यांनी मंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर जोरदार प्रहार केला. त्या म्हणाल्या:
​”राळेगाव हा राखीव मतदारसंघ असून त्याचे प्रतिनिधित्व खुद्द आदिवासी विकास मंत्री करत आहेत. राज्यात आणि केंद्रात सत्ता असतानाही जर त्यांच्याच मतदारसंघातील ३४ मुली असुरक्षित असतील, तर हे मंत्र्यांचे सर्वात मोठे अपयश आहे. समाजात शांतता राखण्याची जबाबदारी असताना, मंत्र्यांनी स्वतः बंद पुकारून हिंसेला खतपाणी घालणे हे अत्यंत बेजबाबदारपणाचे लक्षण आहे.”
​तेलंगे यांनी पुढे असा आरोप केला की, राळेगावमध्ये हिंदू-मुस्लिम समाजाचे संबंध सलोख्याचे आहेत, मात्र राजकीय फायद्यासाठी जाणीवपूर्वक दंगल घडवण्याचा हा प्रयत्न आहे. ज्या मंत्र्यांना आपल्या मतदारसंघातील मुलींचे रक्षण करता येत नाही, त्यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असे म्हणत त्यांनी उईके यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.
​पोलीस प्रशासनाचा धक्कादायक खुलासा या प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमित ढोबळे यांनी समोर आणला. ढोबळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची भेट घेऊन या कथित ३४ बेपत्ता मुलींची अधिकृत माहिती मागितली. मात्र, पोलीस प्रशासनाकडून मिळालेली माहिती धक्कादायक आहे. पोलीस रेकॉर्डवर अशा प्रकारची कोणतीही तक्रार किंवा ३४ मुली बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल नाही. या खुलाशामुळे ‘३४’ हा आकडा मंत्र्यांकडे आला कुठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजकीय लाभासाठी आदिवासी समाजाला आणि मुलींना विनाकारण बदनाम करण्याचे हे एक मोठे ‘षडयंत्र’ असल्याचे ॲड. तेलंगे यांनी यावेळी नमूद केले.
​पीडित मातेची व्यथा आणि प्रशासनाची हतबलता या पत्रकार परिषदेत कळंब येथील एका पीडित अल्पवयीन मुलीची आई देखील उपस्थित होती. तिची व्यथा मांडताना तेलंगे यांनी सरकारला चपराक लगावली. तीन महिन्यांपूर्वी या मुलीला फुस लावून पळवून नेल्याची अधिकृत तक्रार कळंब पोलीस ठाण्यात नोंदवलेली आहे. मात्र, अद्याप या मुलीचा शोध लागलेला नाही. “एकीकडे खोट्या आकड्यांवरून राजकारण सुरू आहे, तर दुसरीकडे ज्या मुलीची नोंद दप्तरी आहे, तिला शोधण्यास प्रशासन हतबल आहे,” अशी टीका त्यांनी केली. ​२४ एप्रिलला यवतमाळात भव्य मोर्चा भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चव्हाण आणि मंत्री अशोक उईके यांनी आदिवासी समाजाची नाहक बदनामी केल्याचा दावा करत आता विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणाच्या निषेधार्थ २४ एप्रिल रोजी यवतमाळ येथे ‘आदिवासी विकास परिषद मंच’ आणि विविध सामाजिक संघटनांतर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
​मागण्या आणि इशारा: * भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रोसिटी) गुन्हा दाखल करावा.
​समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई व्हावी.
​जर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, तर थेट न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा ॲड. सीमा तेलंगे यांनी दिला आहे.
​या पत्रकार परिषदेला अमित ढोबळे, श्याम बजाज, ॲड. जयसिंह चव्हाण, पंकज कांबळे, विनोद दोंदल, गोविंद चव्हाण, ॲड. वैभव पंडित यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आता या मोर्चाकडे आणि प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

          ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!