🔥विजेचा शॉक देऊन आखला हत्येचा कट पंगडी येथील घटना प्रियकरासाठी पत्नी उठली पतीच्या जीवावर.
यवतमाळ -/अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याच्या संशयातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील पंगडी येथे उघडकीस आली आहे. झोपेत असलेल्या पतीला विजेचा शॉक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याप्रकरणी वडगाव जंगल पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली असून न्यायालयाने त्यांना कारागृहात पाठविले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन वसंता मोरे (३८, रा. पंगडी, ता. कळंब) यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या पत्नी कवडी गजानन मोरे (३५) हिचे गावातीलन विष्णु कडू आत्राम (४५) याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.या संबंधात पती अडसर ठरत असल्याने दोघांनी मिळून त्यांना संपविण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले. ३ मे रोजी मध्यरात्रीनंतर सुमारे २ वाजताच्या सुमारास गजानन मोरे हे घरात झोपलेले असताना पत्नीने विद्युत वायरला अॅल्युमिनियमची तार जोडून त्यांना विजेचा शॉक देत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याघटनेतून बचावल्यानंतर मोरे यांनी वडगाव जंगल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०९(१) व ६१(२) अंतर्गत गुन्हा नोंदविला. तपासादरम्यान घटनास्थळावरून विद्युत वायर व अॅल्युमिनियम तार जप्त करण्यात आली. त्यानंतर आरोपी पत्नी व तिच्च्या प्रियकराला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊराव बोकडे करीत असून उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने व ठाणेदार विकास दांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.