यवतमाळ -/जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची तस्करी करणाऱ्या टोळ्यांनी आपले जाळे घट्ट विणले असतानाच, आता पोलीस प्रशासनातील काही ‘काळ्या मेंढ्यांमुळे’ या तस्करांना अभय मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नेर येथील कुख्यात गुटखा तस्कर तनवीर गाठी याच्यावर पोलीस प्रशासन सध्या विशेष ‘मेहरबान’ असल्याचे दिसून येत असून, कारवाईच्या नावाखाली केवळ खानापूर्ती केली जात असल्याचा संतापजनक आरोप आता नागरिकांमधून होत आहे.काही दिवसांपूर्वी लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत तनवीर गाठी याचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा पोलिसांनी पकडला होता. मात्र, या कारवाईनंतर जे नाट्य घडले त्याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन केली आहे. लाडखेड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला पोलीस शिपाई अविनाश ढोणे याने या प्रकरणाचा फायदा घेत गुटखा तस्कर तनवीर गाठी याच्याशी छुपे साटेलोटे केले. या तस्कराला कारवाईतून वाचवण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची लाच उखळल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण ‘दै. साहसिक’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लोहारा आणि लाडखेड पोलीस स्टेशनमधील अविनाश ढोणे, बबलू पठाण आणि प्रशांत राठोड या तिघांना तातडीने निलंबित करण्यात आले. मात्र, प्रश्न हा उपस्थित होतो की, केवळ निलंबन हीच या गुन्ह्याची शिक्षा आहे का?
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, निलंबित असूनही पोलीस शिपाई अविनाश ढोणे याची मुजोरी कमी झालेली नाही. निलंबनाच्या काळातही तो वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाखाली ‘वसुली’ करत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आणि गुन्हेगारी जगतात सुरू आहे. ढोणे याच्या कारनाम्यांचा पाढा खुद्द विधानसभेत आमदारांनी वाचला होता. राज्याच्या सर्वोच्च सभागृहात या भ्रष्ट कारभाराचे पडसाद उमटूनही अद्याप या कर्मचाऱ्यावर कोणतीही ठोस फौजदारी कारवाई झालेली नाही, ही चिंतेची बाब आहे.
नेरचा गुटखा तस्कर तनवीर गाठी याने संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात आपले तस्करीचे मोठे साम्राज्य उभे केले आहे. त्याच्यावर अनेकदा कारवाईचे सोपस्कार पार पाडले जातात, पण तो पुन्हा नव्या जोमाने आपला अवैध धंदा सुरू करतो. लोहारा येथील घटनेनंतर केवळ पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली, पण मुख्य सूत्रधार तनवीर गाठी याच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
तस्कराकडून पाच लाख रुपये घेणाऱ्या पोलिसांवर कारवाई होते, पण ते पैसे देणाऱ्या आणि अवैध धंदा करणाऱ्या तस्कराला अभय का दिले जाते? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली ही कारवाई केवळ जनतेचा डोळा पुसण्यासाठी केलेली ‘खानापूर्ती’ तर नाही ना? अशी शंका आता उपस्थित होत आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात छुप्या मार्गाने गुटखा पोहोचवण्याचे काम तनवीर गाठीची टोळी करत आहे. तरुण पिढीला व्यसनाच्या गर्तेत ढकलणाऱ्या या तस्कराकडे कोट्यवधींची माया कुठून येते? पोलिसांमधील ‘अविनाश ढोणे’ सारखे हस्तक या तस्करांना छुप्या मार्गाने कशी मदत करतात? हे आता तपासाचे मुख्य विषय बनायला हवेत.
केवळ निलंबन म्हणजे गुन्हेगारीला लगाम लावणे नव्हे. जोपर्यंत तनवीर गाठी सारख्या मुख्य तस्करांविरुद्ध कठोर गुन्हे दाखल होऊन त्यांना तुरुंगाची हवा दाखवली जात नाही, तोपर्यंत ही ‘मेहरबानी’ सुरूच राहील. यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून, या भ्रष्ट साखळीचा पर्दाफाश करावा आणि दोषींवर मोक्का किंवा त्यासारख्या कठोर कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
अविनाश ढोणे सारख्या कर्मचाऱ्यांवर आणि तनवीर गाठी सारख्या तस्करांवर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत पोलीस प्रशासनावरील विश्वास जनमानसात परतणार नाही, हे मात्र निश्चित!