🔥दीड लाख नागरिकांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर; २५ जानेवारी २०२७ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
हिंगणघाट -/ कवडघाट परिसरातील वणा नदीपात्रात सुरू असलेले अवैध रेती उत्खनन, साठवणूक आणि वाहतुकीचा गंभीर प्रश्न ‘दैनिक साहसिक’ने सातत्याने मांडल्यानंतर प्रशासनाने अखेर कठोर पाऊल उचलले आहे. हिंगणघाटचे उपविभागीय दंडाधिकारी आकाश अवतारे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. २६ नोव्हेंबर २०२६ ते २५ जानेवारी २०२७ या कालावधीत हे आदेश लागू राहणार आहेत.
🔥दीड लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
वणा नदी ही हिंगणघाट शहरातील सुमारे दीड लाख नागरिकांसह परिसरातील ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठा योजनांचा प्रमुख जलस्रोत आहे. संभाव्य पाणीटंचाईचे संकट असताना नदीपात्रातील अनियंत्रित रेती उत्खननामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, नदीकाठच्या जमिनी, पूल आणि सार्वजनिक मालमत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नदीपात्रात खोल खड्डे पडल्याने नागरिक व जनावरांच्या जीवितालाही धोका संभवतो. या गंभीर बाबींची दखल घेत प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत.
🔥नदीपात्रासह १०० मीटर परिसर प्रतिबंधित
मौजा कवडघाट येथील संपूर्ण वणा नदीपात्र, नदीकाठचा १०० मीटर परिसर तसेच हिंगणघाट नगर परिषदेच्या पाणी उपसा केंद्राच्या वरच्या व खालच्या बाजूस प्रत्येकी एक किलोमीटरपर्यंत नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्यांवर निर्बंध लागू राहणार आहेत.
या प्रतिबंधित क्षेत्रात रेती, वाळू व इतर गौण खनिजांचे उत्खनन, साठवणूक आणि वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रक, टिप्पर, डंपर यांसह जेसीबी, पोकलेन, सक्शन पंप, बोटी आणि तत्सम यंत्रसामग्री नदीपात्रात नेण्यास किंवा उभी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. फावडे, घमेले, चाळणी घेऊन रेती काढण्यासाठी नदीपात्रात प्रवेश करणे तसेच सूर्यास्त ते सूर्योदय या काळात नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्यांचा वापर करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
🔥उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८ (७) व ४८ (८) अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. शासकीय कामे, आपत्कालीन सेवा आणि वैध परवानगी व ई-पासधारकांना आदेशातील अटी व शर्तींनुसार सूट देण्यात आली आहे.
🔥आता प्रशासनाच्या अंमलबजावणीकडे लक्ष!
प्रतिबंधात्मक आदेश जारी झाल्याने अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे. मात्र, केवळ आदेश काढून प्रश्न सुटणार नाही. रात्रीच्या वेळी होणारी अवैध वाहतूक, रेतीचे साठे आणि नदीपात्रात उतरणारी वाहने यांच्यावर महसूल व पोलीस विभाग प्रत्यक्ष किती लक्ष ठेवतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
नदीचे नैसर्गिक अस्तित्व, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे संरक्षण आणि सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षितता यासाठी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.