🔥पिंपळगाव सराई येथे घरफोडी; ९२ हजार २०० रुपयांचे दागिने लंपास.
पिंपळगाव सराई -/गावातील एका शेतकरी कुटुंबाच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल ९२ हजार २०० रुपयांचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल रामलाल शिंगणे यांच्या राहत्या घरी अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून कपाट व दोन लोखंडी पेट्या फोडल्या. त्यामधील सुमारे ८ हजार रुपयांची रोख रक्कम, गळ्यातील ४० नग गहूमणी माळ, सोन्याचे पेंडॉल तसेच लहान मुलांच्या कानातील सोन्याच्या बाळ्या असा एकूण ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
या प्रकरणी दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी विशाल शिंगणे यांनी रायपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार निलेश सोळंके यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
त्यानंतर डॉग स्क्वॉड व फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. डॉग स्क्वॉडने परिसराची पाहणी केली तर फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे संकलित केले. फिंगरप्रिंट तज्ज्ञांनाही बोलावण्यात आले असून तपासाची दिशा निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास एच.डी.बी. साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार निलेश सोळंके यांच्या नेतृत्वात पोहेकॉ. कैलास खर्डे, पोलीस कॉन्स्टेबल अझरुद्दीन काझी तसेच अनंत कळमकर करीत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे.