हिंगणा कार्यालयात कारभाराचा भांडाफोड! सहाय्यक निबंधक पंकज वानखेडे गैरहजर — नागरिक संतप्त

0

🔥हिंगणा कार्यालयात कारभाराचा भांडाफोड! सहाय्यक निबंधक पंकज वानखेडे गैरहजर — नागरिक संतप्त.

हिंगणा -/ हिंगणा तालुक्यातील सहाय्यक निबंधक पंकज वानखेडे यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा मोठा मुद्दा समोर आला आहे. अतिरिक्त कार्यभारामुळे ते हिंगणा कार्यालयात नियमित हजर राहत नसल्याची बाब उघड झाली आहे. धक्कादायक म्हणजे आठवड्यातून किमान दोन दिवस सुद्धा ते कार्यालयात उपस्थित राहत नसल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिणामी, विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असून अनेक कामे रखडलेली आहेत.

पंकज वानखेडे यांच्याकडे नागपूर जिल्हा ग्रामीणचा अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे ते त्या कामातच व्यस्त राहतात आणि हिंगणा तालुक्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. यामुळे हिंगणा तालुक्यातील सहकार विभागाचे कामकाज अक्षरशः ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सामान्य नागरिक, शेतकरी तसेच सहकारी संस्थांशी संबंधित व्यक्तींना याचा मोठा फटका बसत आहे.

दरम्यान, हिंगणा तालुक्यातील गृह निर्माण सहकारी संस्थांकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भोंगळ कारभार झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात अनेक वेळा हिंगणा कार्यालयात तसेच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी सादर करण्यात आल्या आहेत. मात्र, या तक्रारींची दखल घेतली जात नसल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाईचा अभाव असल्याने गैरप्रकारांना खतपाणी मिळत असल्याची चर्चा सुरू आहे.
नागरिकांचा संयम आता संपत चालला असून नवीन सहाय्यक निबंधकाची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
नुकतेच नागपूर जिल्ह्यातील एका सहाय्यक निबंधकाला सहकार मंत्र्यांकडून निलंबित करण्यात आलेल्या घटनेनंतर हिंगणा येथील कामकाजावरही संशयाची छाया पडली आहे. योग्य पद्धतीने तपास झाल्यास येथेही मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई होऊ शकते, अशी चर्चा आता जोरात सुरू आहे.
हिंगणातील प्रशासन झोपेतून जागे होणार का? की नागरिकांना अजूनही त्रास सहन करावा लागणार?

         गजानन ढाकुलकर               साहसिक News-/24 हिंगणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!