🔥दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी दिला यशाचा मंत्र.!दीपचंद चौधरी विद्यालयात मार्गदर्शन-समुपदेशन कार्यक्रम उत्साहात.
सेलू -/ नुकतीच यावर्षीची नववीची वार्षिक परीक्षा आटोपल्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षात दहावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येथील दीपचंद चौधरी विद्यालयात मार्गदर्शन व समुपदेशन कार्यक्रम उत्साहात पार पडला. दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा असल्याने योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास व शिस्त यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ कल्पना मकरांदे होत्या. याप्रसंगी पर्यवेक्षक जी. बी. खंडागळे व एच. जे. मुडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मार्गदर्शक म्हणून डॉ प्रशांत चव्हाण, नितीन वांदिले आणि हेमंत घोडमारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण घोडखांदे यांनी केले.
यावेळी डॉ प्रशांत चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे योग्य नियोजन, वेळापत्रक तयार करणे, नियमित उजळणी, लेखन सराव, चुका दुरुस्त करून सुधारणा करणे याविषयी मार्गदर्शन केले. मोबाईल, टीव्ही यांसारख्या मनोरंजन साधनांचा मर्यादित वापर, ताणतणावमुक्त अभ्यास आणि ध्येय निश्चितीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. शाळेतील नियमित उपस्थिती, शिस्त, चिकाटी आणि सातत्य यामुळे आत्मविश्वास वाढतो व आजचे प्रयत्न उद्याच्या यशाचा पाया ठरतात, असे त्यांनी सांगितले.
नितीन वांदिले यांनी सर्व विषयांचा संतुलित अभ्यास करण्याचे महत्त्व पटवून देत अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयावर लक्ष केंद्रित करून तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी आवश्यक असलेल्या विविध शासकीय प्रमाणपत्रे व कागदपत्रांची माहिती देत ती कशी मिळवावी याविषयीही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ कल्पना मकरांदे यांनी शिस्त, स्वच्छता, उत्तम आरोग्य आणि सकारात्मक विचार यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षक, पालक आणि संपूर्ण शाळा त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे आश्वासन देत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही आपले अभिप्राय व्यक्त करत मार्गदर्शन उपयुक्त ठरल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे दहावीच्या वर्षासाठी योग्य दिशा मिळाल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास दहावीतील सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्योती लोडे, कु. विजया कुकडे, मिथुन हांडे व सुभाष कोवे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रवीण घोडखांदे यांनी, तर आभार प्रदर्शन विलास खैरकार यांनी मानले. ध्यानसाधना, प्रार्थना व स्फूर्तीगीतांमुळे कार्यक्रम अधिक रोचक व उत्साहवर्धक ठरला.