🔥आर्णी येथील बियर बार मधुन ग्रामीण भागात अवैध दारू पुरवठा?पोलिस प्रशासन तसेच उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाचे दुर्लक्ष.
आर्णी (जि. यवतमाळ) –/ शहरातील काही बियर बारमधून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारूचा अवैध पुरवठा होत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. ही दारू गुप्तपणे गावोगावी पोहोचवली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर्णी शहरातील काही बियर बार हे केवळ परवानाधारक विक्रीपुरते मर्यादित न राहता अवैध वितरणाचे केंद्र बनले असल्याची चर्चा रंगली आहे. या बारमधून थेट दारूच्या पेट्या बाहेर काढून त्या ग्रामीण भागात पोहोचवल्या जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या साखळीत काही देशी दारू विक्रेते आणि बियर बार चालक यांच्यात संगनमत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “बारमधून थेट दारूच्या पेट्या बाहेर जातात आणि त्या गावोगावी पोहोचतात. हा प्रकार सर्वांना माहित असूनही कारवाई होत नाही,” अशी प्रतिक्रिया एका संतप्त नागरिकाने दिली.
दरम्यान, शहरातील काही बियर बार रात्री उशिरापर्यंत सुरू असते. या संपूर्ण प्रकाराकडे पोलिस प्रशासन तसेच उत्पादन शुल्क (एक्साईज) विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही होत आहे.
वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. काही ठिकाणी कारवाई झाली असली तरी ती अपुरी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
या अवैध दारू पुरवठ्याच्या साखळीवर तात्काळ कठोर कारवाई करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता पुढे येत आहे.(क्रमशः)