🔥गोवंश हत्या बंदी व बकरी ईद दरम्यान होणारी गोवंश कुर्बानी रोखण्यासाठी मुख्यमंत्री यांना निवेदन.
वर्धा -/ वर्धा जिल्ह्यात नियमितपणे होत असलेली अवैध गोवंश हत्या तसेच बकरी ईद दरम्यान जाणूनबुजून केली जाणारी गोवंशाची कुर्बानी तात्काळ थांबविण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.या निवेदनात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या “स्टेट ऑफ गुजरात विरुद्ध मिर्झापूर मोती कुरेशी कसाब” या ऐतिहासिक निकालाचा संदर्भ देत गोवंश संरक्षणासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भारतीय संस्कृती, शेती, पर्यावरण व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या गोवंशाचे संरक्षण करणे हे केवळ धार्मिक नव्हे तर संवैधानिक कर्तव्य आहे. भारतीय संविधानाच्या कलम ४८ नुसार राज्यावर गोसंरक्षणाची जबाबदारी असून कलम ५१अ(ग) नुसार प्रत्येक नागरिकाने सर्व सजीव प्राण्यांविषयी करुणा बाळगणे आवश्यक आहे.तसेच महाराष्ट्रात लागू असलेल्या कायद्यांनुसार गोवंश हत्या हा दंडनीय गुन्हा असूनही काही ठिकाणी अवैधरित्या गोवंश वाहतूक, कत्तल व कुर्बानी सुरू असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अशा घटनांमुळे समाजातील धार्मिक भावना दुखावल्या जात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वाढत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. गोवंश संरक्षण ही भारतीय परंपरा, संत परंपरा व राष्ट्रपुरुषांनी दिलेली शिकवण असल्याचे नमूद करत भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा व महात्मा गांधी यांच्या विचारांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
प्रशासनाने या विषयाकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहून जिल्ह्यातील अवैध गोवंश हत्या तात्काळ बंद करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच बकरी ईद दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती मा. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. पालकमंत्री वर्धा जिल्हा, मा. जिल्हाधिकारी वर्धा, मा. पोलीस अधीक्षक वर्धा, संबंधित आमदार व ठाणेदार यांनाही देण्यात आल्या आहेत.वर्धा जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांना निवेदन देते वेळी विश्व हिंदु परिषद वर्धा जिल्हा मंत्री शरद कोणप्रतिवार, सहमंत्री संजय पोफळी, वर्धा जिल्हा सामाजिक समरसता विहिप प्रमुख अशोक तट्टे,वर्धा जिल्हा बजरंग दल संयोजक महेश राऊत, सहसंयोजक अमोल अतकर, सहसंयोजक प्रशांत यादव,वर्धा नगर विहिप गौरक्षा व गौसवर्धन प्रमुख श्रीकांत साटोणे,रवी बडवाईक, वर्धा नगर बजरंग दल संयोजक किरण उपाध्याय, गोविंद पांडे, महेश हटवार या वेळी उपस्थित होते.