कापूस उत्पादकांच्या फसवणुकीवर सिंदी बाजार समितीचा दणका!

0

🔥कापूस उत्पादकांच्या फसवणुकीवर सिंदी बाजार समितीचा दणका!

🔥थेट पणन परवानाधारक व्यापाऱ्याचा परवाना रद्द करण्याची शिफारस;….. बाऊन्स चेक, खोट्या RTGS प्रकरणात शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रशासन खंबीर

सेलु -/ हिंगणी येथील मे. सर्वज्ञ जिनिंग अँड प्रेसिंग (प्रवीण बोरकुटे इन्फ्राव्हेंचर्स प्रा.लि.) या थेट पणन परवानाधारक (DML) व्यापाऱ्याकडून नागपूर व वर्धा जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची झालेली कथित आर्थिक फसवणूक आता उघडकीस आली असून, या प्रकरणाने शेतकरी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खात्यात पुरेशी रक्कम नसताना धनादेश देणे तसेच RTGSच्या नावाखाली मूळ धनादेश परत घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

या गंभीर प्रकरणात पीडित शेतकऱ्यांनी पुणे येथील वरिष्ठ कार्यालयाऐवजी आपल्या हक्काच्या स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदी येथे धाव घेतली. शेतकऱ्यांचा हा विश्वास सार्थ ठरवत बाजार समिती प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

🔥बाजार समितीची आक्रमक भूमिका.

थेट पणन परवानाधारक व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार पणन संचालक व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडे असले तरी सिंदी बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार घेतला आहे.

सभापती केशरीचंद खंगारे, संचालक मंडळ व सचिव महेंद्र भांडारकर यांनी व्यापाऱ्याचा परवाना रद्द करण्यासाठी आणि बँक गॅरंटी जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी पणन संचालकांकडे अधिकृत शिफारस पाठवली आहे.

पीडित शेतकऱ्यांच्या वतीने बुटीबोरी व सिंदी रेल्वे पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.

कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी येथील शेतकऱ्यांनाही न्याय मिळवून देण्यासाठी बाजार समितीने मदतीचा हात पुढे केला आहे.

🔥फसवणुकीत अडकलेले शेतकरी

विजय रामचंद्र गहरुले (सावंगी भन्सोळी) : २०.४५ क्विंटल कापसाच्या मोबदल्यातील ₹१,४२,७८३ चा धनादेश बाऊन्स.केतन जगदीश सुपे (असोला) : २२.१५ क्विंटल कापसापोटी मिळालेला ₹१,७०,१६३ चा चेक RTGSच्या नावाखाली परत घेण्यात आल्याचा आरोप.

देवेंद्र वसंतराव झिलपे (सिंदी रेल्वे) : ₹२,०३,३३७ ची रक्कम अद्याप थकीत.

तेलकामठी येथील शेतकरी गट : रामचंद्र भोपे, रोशन भोवे, प्रशांत चवणे व इतर शेतकऱ्यांनाही खोट्या आश्वासनांनी थकबाकीत ठेवण्यात आल्याची तक्रार.

🔥शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन

सिंदी बाजार समितीने शेतकरी बांधवांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

✔ RTGSच्या नावाखाली मूळ धनादेश परत देऊ नका.

✔ प्रत्यक्ष खात्यात रक्कम जमा झाल्याची खात्री झाल्यानंतरच चेक परत करा.

✔ थेट पणन परवानाधारक व्यापाऱ्याकडून २४ तासांत पेमेंट न मिळाल्यास तात्काळ बाजार समितीशी संपर्क साधा.

🔥शेतकऱ्यांचा बाजार समितीवर विश्वास

कायदेशीर अधिकार मर्यादित असतानाही सिंदी बाजार समितीने शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पुढाकार घेतल्याने बळीराजामध्ये समाधान व्यक्त होत आहे. “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू,” अशी ग्वाही सभापती केशरीचंद खंगारे, सचिव महेंद्र भांडारकर आणि संचालक मंडळाने दिली आहे.

            ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 सेलू वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!