देवळी -/ शहरातील काही औषध विक्री दुकानांमध्ये औषध विक्री करताना कायदेशीर नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. औषध विक्रीसाठी नोंदणीकृत फार्मासिस्टची उपस्थिती बंधनकारक असतानाही अनेक दुकानात संबंधित विभागाची कोणतीही पदवीका किंवा अनुभव नसलेल्या व्यक्तींकडून ग्राहकांना औषधे दिली जात आहे.
औषधांची विक्री ही सामान्य व्यवसापेक्षा वेगळी असून ती नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. त्यामुळे औषध दुकानाचा परवाना ज्या व्यक्तीच्या नावावर आहे अथवा ज्या फार्मासिस्टच्या नावावर नोंदणी आहे, त्याची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक मानली जाते. मात्र काही दुकानांमध्ये परवाना एका व्यक्तीच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावावर असला तरी व्यवहार इतरांकडून चालविले जात आहे.
विशेष म्हणजे काही ठिकाणी फार्मासिस्ट दुकानात नसतानाही ग्राहकांना औषधांचे वितरण सुरू असल्याची बाब चिंताजनक मानली जात आहे. अशा प्रकारामुळे चुकीची औषधे, चुकीचा डोस किंवा वैद्यकीय सल्ल्याविना औषधांचा वापर होण्याचा धोका वाढत असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात आहे.
औषध विक्रीसंदर्भातील नियमांनुसार प्रिस्क्रिप्शनवर मिळणारी औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करता येत नाहीत. तसेच औषध विक्रीच्या वेळी पात्र फार्मासिस्टची उपस्थिती आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.
देवळी शहरातील काही दवाखान्यांमध्ये दवाखान्याच्या बाजूलाच किंवा दवाखान्यातच औषधी विक्रीचे दुकान उघडले आहे त्यासाठी लागणारा परवाना हा भाडेतत्त्वावर घेण्यात येत आहे व ते औषधी दुकान चालविण्याकरिता औषधी दुकानाशी काहीही संबंध नसलेल्या अनुभव नसलेल्या व्यक्ती औषध विक्री करीत आहे तसेच औषधी विक्रीचा परवाना पत्नीच्या नावावर तर प्रत्यक्ष औषधाची विक्री मात्र त्यांचे पती करताना दिसत आहे ज्या व्यक्तीच्या नावावर परवाना आहे ती व्यक्ती कधीही त्या दुकानात दिसत नाही. आणि औषधी दुकान चालविण्यासाठी लागणारे शासकीय मापदंड देवळी शहरातील बऱ्याच दुकानात मानले जात नाही तरीही सर्रासपणे औषधी विक्री करून रुग्णांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे यांना कोणाच्या आशीर्वादाणे नियमबाह्य काम करीत आहे? असा प्रश्न देवळीकर जनता विचारू लागली आहे.
देवळी शहरातील औषध दुकानांची अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवून पाहणी करावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा कथित खेळ थांबवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
🔥सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ थांबविणे अत्यंत आवश्यक असून यामध्ये दोषी दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच या दोषी दुकानदारांना अभय देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी मी अशी शासनाला विनंती करीत आहे (गजानन महल्ले सामाजिक कार्यकर्ता देवळी)