वीज कोसळून बैलजोडी ठार; शेतकरी बबन बावणे यांचे मोठे आर्थिक नुकसान…

0

🔥वीज कोसळून बैलजोडी ठार; शेतकरी बबन बावणे यांचे मोठे आर्थिक नुकसान..

हिंगणघाट,प्रतिनिधी (ईकबाल पहेलवान -/ हिंगणघाट तालुक्यातील नांदगाव (बो.) येथे विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसादरम्यान वीज कोसळून शेतकरी बबन विठ्ठल बावणे यांच्या बैलजोडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे बावणे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ जून मंगळवार रोजी सायंकाळी सुमारे ४.३० ते ५ वाजताच्या दरम्यान परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू होता. यावेळी बबन बावणे यांच्या मालकीची बैलजोडी शेतात बांधून ठेवण्यात आली होती. अचानक वीज कोसळल्याने दोन्ही बैल गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतकऱ्याच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन असलेली बैलजोडी गमावल्याने बावणे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. शेतीच्या विविध कामांसाठी या बैलांचा उपयोग होत असल्याने आगामी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

घटनेनंतर ग्राम महसूल अधिकारी नांदगाव (बो.) यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक अहवालानुसार वीज पडल्यामुळेच बैलांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले असून संबंधित अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानीची दखल घेऊन शासनाने शेतकरी बबन बावणे यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आधीच संकटात सापडला असताना ही घटना त्याच्या अडचणीत आणखी भर घालणारी ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!