दिशा’ बैठकीच्या नावाखाली खासदार संजय देशमुखांचा केवळ फार्स?

0

🔥हाच तो खंडणीखोर वसुलीबाज खासदार संजय देशमुखांचा पिए गजानन नाचपेल्लीवार

🔥दिशा’ बैठकीच्या नावाखाली खासदार संजय देशमुखांचा केवळ फार्स?

🔥​वर्धा-नांदेड रेल्वे प्रकल्पातील अनियमिततेवर पांघरूण घालण्याचा विरोधकांचा आरोप; >कथित वसुलीवरून यवतमाळच्या राजकीय वर्तुळात खळबळ

🔥खा. संजय देशुमाखांना रेल्वे कंत्राटदाराकडुन खोक्याचे बक्षीस 

🔥गजानन नाचपेल्लीवारच्या कथीत 25 लाखांच्या वसुलीची चांगलीच चर्चा 

​यवतमाळ,प्रतिनिधी -/ केंद्र शासनाच्या कोट्यवधींच्या विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी यवतमाळमध्ये जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र, तब्बल दोन वर्षांच्या प्रदीर्घ विलंबाने होत असलेली ही बैठक लोकहितासाठी नसून केवळ स्वतःच्या कारभारावर पांघरूण घालण्याचा निव्वळ फार्स असल्याचा घणाघाती आरोप आता राजकीय वर्तुळातून होऊ लागला आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील कथित गौण खनिज गैरव्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाणीच्या चर्चांमुळे ही बैठक सुरू होण्यापूर्वीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

​जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कै. वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृहात पार पडणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील केंद्र पुरस्कृत योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. प्रत्यक्षात मात्र, मतदारसंघातील मूलभूत प्रश्नांकडे प्रदीर्घ काळ दुर्लक्ष करणाऱ्या खासदारांना दोन वर्षांनंतर अचानक ‘दिशा’ समितीची आठवण कशी झाली, असा रोकडा सवाल आता विरोधक आणि स्थानिक नागरिकांमधून विचारला जात आहे.

यवतमाळ-वाशीम जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे काम सध्या जिल्ह्यात सुरू आहे. या कामात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय व तांत्रिक अनियमितता झाल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. रेल्वे रुळांच्या भरावासाठी लागणारा मुरूम आणि दगडांचे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत उत्खनन जिल्ह्यात सुरू असून, महसूल विभागाचे नियम धाब्यावर बसवून शेकडो ब्रास खनिजाची चोरी होत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत.

​या पार्श्वभूमीवर, अशा गंभीर गैरव्यवहारांवर कठोर कारवाई करण्याऐवजी खासदार कार्यालयाने याकडे सोयीस्कर डोळेझाक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अवैध उत्खननाला राजकीय पाठबळ मिळाल्यामुळेच हा प्रकल्प सध्या भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकल्याची चर्चा यवतमाळमध्ये रंगली आहे. केवळ प्रकल्पच नव्हे, तर बैठकीच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बैठकीत अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढण्याऐवजी आधीच अर्थपूर्ण तडजोडी झाल्याचा आरोप दबक्या आवाजात केला जात आहे. खासदारांचे स्वीय सहाय्यक गजानन नाचपेल्लीवार यांच्यामार्फत विविध खात्यांकडून विशिष्ट ‘पाकिटे’ गोळा करण्यात आल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी यंत्रणेवर दबाव आणून खंडणी सदृश कारभार चालवला जात असल्याचा आरोप करत, काही अधिकाऱ्यांनी या खाजगी हस्तक्षेपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे उद्या होणारी बैठक ही केवळ कागदोपत्री सोपस्कार ठरणार का, अशी शंका उपस्थित होत आहे.

खासदार संजय देशमुख यांच्या भूमिकेवर बोट ठेवताना विरोधकांनी अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. “खासदारांच्या शब्दातील धार आता संपली असून ती राजकीय तडजोडींच्या आणि कथित आर्थिक लाभांच्या ओझ्याखाली बोथट झाली आहे. स्वतःचे अपयश आणि कामांमधील भ्रष्टाचार लपवण्यासाठीच ही बैठकीची धूळफेक केली जात आहे,” असा थेट आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच, प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या कथित खंडणीबहाद्दर स्वीय सहाय्यकावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी उघड मागणीही आता जोर धरू लागली आहे.

केंद्राच्या विविध कल्याणकारी योजना, पंतप्रधान ग्रामसडक योजना, जलजीवन मिशन, राष्ट्रीय महामार्ग आणि थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी यांसारख्या अत्यंत संवेदनशील विषयांवर ‘दिशा’ समितीमध्ये लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला जाब विचारणे अपेक्षित असते. मात्र, जर समितीच्या प्रमुखांवरच गैरव्यवहारांना पाठीशी घातल्याचे आणि वसुलीचे आरोप होत असतील, तर सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

​उद्या वसंतराव नाईक सभागृहात होणाऱ्या या बैठकीत खरोखर रेल्वे प्रकल्पातील अवैध उत्खनन आणि निकृष्ट कामांवर खासदार देशमुख बोट ठेवणार की आरोपांप्रमाणे हा सर्व प्रकार प्रशासकीय पाठराखणीतच विरून जाणार, याकडे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)

          ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!