प्रतिनिधी यवतमाळ-/खाकी वर्दीचा धाक गुन्हेगारांवर असावा की कायद्याचे रक्षण करणाऱ्यांवरच गुन्हेगारांचा वरदहस्त असावा, असा उद्विग्न सवाल सध्या आर्णी तालुक्यातील सर्वसामान्य जनता विचारत आहे. आर्णी पोलीस ठाण्यात ठाणेदाराचा खास ‘रायटर’ म्हणून मिरवणारा पोलीस कर्मचारी गुणवंत बोईनवाड याच्या कथित खंडणीखोर व मनमानी कारभाराने सध्या तालुक्यात कायद्याचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. पोलीस ठाण्यावर वरिष्ठांचे नियंत्रण उरले नसून या तथाकथित रायटरच्या छुप्या आशिर्वादाने संपूर्ण आर्णी शहर आणि ग्रामीण पट्ट्यात अवैध धंदे, गुटखा माफिया आणि मटका जुगाराचे काऊंटर उघड माथ्याने सुरू असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
पोलीस दलात ठाणेदाराचा रायटर हा प्रशासकीय कामकाजाचा कणा मानला जातो. मात्र, आर्णी पोलीस ठाण्यात हे पद प्रशासकीय नसून निव्वळ ‘वसुली एजंट’चे केंद्र बनल्याचे उघड झाले आहे. गुणवंत बोईनवाड हा पोलीस ठाण्यात स्वतःला ठाणेदारांचा अतिशय मर्जीतील आणि सर्वेसर्वा भासवून संपूर्ण परिसरातील गुन्हेगारी सिंडिकेट चालवत असल्याची जोरदार चर्चा आहे. ठाणेदारांच्या नावाचा गैरवापर करून अथवा त्यांच्या मूक संमतीने तालुक्यातील प्रत्येक अवैध अड्ड्यावरून नियमितपणे लाखो रुपयांची मलई लाटली जात आहे. यामुळे आर्णी पोलीस ठाणे म्हणजे न्याय मिळण्याचे ठिकाण उरले नसून अवैध धंदे चालवणाऱ्यांचे ‘संरक्षण केंद्र’ बनले आहे. केवळ हप्तेखोरीवरच हा प्रकार थांबलेला नाही, तर दाखल होणारे गंभीर गुन्हे दाबण्यात (क्राईम बर्किंग) गुणवंत बोईनवाड याचा मोठा हातखंडा निर्माण झाला आहे. नुकत्याच घडलेल्या एका चोरीच्या गुन्ह्यात संशयित आरोपीला पोलीस कोठडीची हवा दाखवण्याऐवजी, पोलीस ठाण्याच्या बाहेरच्या बाहेरच तडजोड करून प्रकरण मिटवण्यात आले. कायद्यानुसार एफआयआर नोंदवून न्यायालयात हजर करण्याऐवजी ठाण्याच्या पायरीवरूनच ‘अर्थपूर्ण’ व्यवहारातून आरोपीला सोडण्यात आल्याची कुणकुण शहरात पसरली आणि पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर थुंकण्याची वेळ जनतेवर आली. गुन्हेगारांना पाठीशी घालून कायद्याचा बळी देणारा हा कर्मचारी नेमका कोणाच्या बळावर ही मुजोरी करत आहे, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
आर्णी शहरात सध्या गल्लीबोळांत मटका आणि जुगाराचे उघड काऊंटर थाटले गेले आहेत. शाळा, महाविद्यालये आणि रहिवासी वस्त्यांच्या तोंडावर सुरू असलेल्या या अड्ड्यांमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. सुज्ञ नागरिकांनी, महिला मंडळांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यासंदर्भात वारंवार ठाणेदारांचे उंबरठे झिजवले, लेखी निवेदने दिली; मात्र प्रत्येक वेळी तक्रारींची फाईल या कथित रायटरच्या टेबलवर येऊन गायब झाली.
त्यातच आर्णीजवळील लोनबेहळ परिसरातील हॉटेल्स आणि लॉजवर रात्रीच्या सुमारास अनैतिक मानवी व्यापार आणि विकृत कृत्यांना उधाण आले आहे. या महामार्गावरील लॉजमध्ये चालणाऱ्या गैरकृत्यांची संपूर्ण माहिती पोलीस प्रशासनाला असतानाही केवळ बोईनवाडच्या ‘अर्थपूर्ण’ मध्यस्थीमुळे या अड्ड्यांवर आजवर एकही ठोस छापा पडलेला नाही.
शालेय मुलांपासून ते मजुरांपर्यंत सर्वांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या प्रतिबंधित सुगंधित गुटख्याची तालुक्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, महेबुब आणि जयस्वाल नावाच्या कुख्यात गुटखा तस्करांना आर्णी शहरात व ग्रामीण भागात विषारी गुटख्याची खेप उतरवण्यासाठी या पोलीस कर्मचाऱ्याने थेट ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे.
दरमहा लाखो रुपयांचा मलिदा या तस्करांकडून वसूल करून ठाण्यातील वरिष्ठ पातळीपर्यंत वाटा पोहोचवला जात असल्याची चर्चा आहे. अन्न व औषध प्रशासन अथवा विशेष पथकाची कारवाई होण्याची चाहूल लागताच तस्करांना आधीच सावध करण्याचे ‘इन्फॉर्मर’चे कामही खाकी वर्दीतील हा कर्मचारी चोख बजावत असल्याचे बोलले जाते.
एका साध्या पोलीस अंमलदाराची एवढी हिंमत कशी होऊ शकते, हा खरा संशोधनाचा विषय आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश देत असताना, आर्णीत मात्र एका कर्मचाऱ्याच्या तालावर संपूर्ण पोलीस यंत्रणा नाचत आहे. वरिष्ठांकडे तक्रारी जाऊनही गुणवंत बोईनवाड याच्यावर साधी चौकशी का लावली जात नाही? त्याच्या मालमत्तेची आणि कॉल डिटेल्सची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी का होत नाही?
आर्णीकरांच्या संयमाचा बांध आता सुटत चालला असून, जर या खंडणीखोर कर्मचाऱ्याची तात्काळ उचलबांगडी करून निलंबनाची कारवाई झाली नाही आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन केले नाही, तर थेट पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. वरिष्ठांनी आता तरी डोळे उघडून या भ्रष्ट कारभाराची झाडाझडती घ्यावी, अन्यथा आर्णी पोलिसांची उरलीसुरली प्रतिष्ठाही या कथित ‘रायटर’च्या गैरकृत्यांत वाहून जाईल.(क्रमशः)