वडगाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींच्या निधीचा घोळ? हिशोब लपविल्याने उपसरपंचांचा आमरण उपोषण 

0

🔥वडगाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींच्या निधीचा घोळ? हिशोब लपविल्याने उपसरपंचांचा आमरण उपोषण 

🔥ग्रामसभेच्या ठरावानंतरही पाच वर्षांतील कामांची माहिती देण्यास टाळाटाळ

🔥​अमरावती विभागीय आयुक्तांकडे लेखी तक्रार; दिग्रस तालुक्यात खळबळ

यवतमाळ -/ दिग्रस तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीमध्ये सन २०२१ ते २०२६ या पाच वर्षांच्या कालावधीत विविध योजनांमधून प्राप्त झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास निधीचा आणि प्रत्यक्ष झालेल्या कामांचा हिशोब देण्यास ग्रामपंचायत प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ग्रामसभेने सर्वानुमते ठराव मंजूर करूनही लेखी तपशील दडपला जात असल्याने, संतप्त उपसरपंच किशोर सुभाष चव्हाण यांनी थेट अमरावती विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आहे. हिशोब सार्वजनिक न झाल्यास २३ सप्टेंबरपासून गावात आमरण उपोषण छेडण्याचा इशारा त्यांनी दिल्याने स्थानिक राजकीय व प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

​वडगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा ८ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडली होती. या सभेत मागील पाच वर्षांत ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला निधी, प्रत्यक्ष खर्च आणि मंजूर विकासकामे यावर विस्तृत चर्चा होऊन सर्व कामांचा तपशील ग्रामस्थांसमोर मांडण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. मात्र, ग्रामसभेच्या ठरावाला हरताळ फासत ग्रामपंचायत प्रशासनाने हा हिशोब देण्यास पूर्णपणे नकारघंटा वाजवली असल्याचा आरोप उपसरपंचांनी केला आहे. २०२१ ते २०२६ दरम्यान प्राप्त स्थानिक विकास निधी, आमदार-खासदार निधी, जिल्हा परिषद सेस फंड, स्वच्छ भारत अभियान आणि ‘हर घर जल’ नळ पाणीपुरवठा योजनांचा योजनानिहाय तपशील, अंदाजपत्रके, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता. प्रत्येक कामाची मोजमाप पुस्तिका पूर्णत्व प्रमाणपत्रे संबंधित व्हाउचर्स आणि कंत्राटदारांची देयके. काम सुरू होण्यापूर्वीचे आणि काम पूर्ण झाल्यानंतरचे जिओ-टॅगिंगसह छायाचित्रे तसेच कामांची तपासणी करणाऱ्या अभियंत्यांचे तांत्रिक प्रमाणपत्र.

 पाणीपट्टी व घरपट्टी वसुली, बँक खात्यांचे स्टेटमेंट, शोषखड्डे व कचरा व्यवस्थापनाचा खर्च आणि ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील मालमत्तांपासून मिळालेले उत्पन्न. मागील पाच वर्षांतील लेखापरीक्षण (Audit) अहवालातील आक्षेप, त्यावर झालेली पूर्तता तसेच गावातील अतिक्रमणे व गटार-रस्त्यांची सद्यस्थिती.

​उपसरपंचांनी नियमानुसार रीतसर अर्ज करूनही विहित मुदतीत कोणतीही माहिती उपलब्ध करून देण्यात आली नाही. गावात विविध विकासकामांच्या नावाखाली केवळ कागदोपत्री घोडे नाचवून निधी लाटण्यात आला आहे का, असा संशय आता ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. हा संपूर्ण हिशोब केवळ कागदावर मर्यादित न ठेवता, ग्रामपंचायत कार्यालय आणि गावातील प्रमुख चौकांमध्ये फलक लावून जाहीर करावा, अशी आग्रही मागणी उपसरपंचांनी केली आहे.

​प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेविरुद्ध उपसरपंच किशोर चव्हाण यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत स्पष्ट इशारा दिला आहे की, “मंजूर ठरावानुसार जर तत्काळ संपूर्ण हिशोब दिला गेला नाही, तर २३ सप्टेंबर २०२६ पासून वडगाव येथील श्री वसंतराव नाईक चौकात आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. या आंदोलनादरम्यान जिवाला काही बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासकीय विभागाची राहील.” या तक्रार अर्जाची प्रत दिग्रसचे तहसीलदार यांनाही पुढील कारवाईसाठी सादर करण्यात आली आहे.

​या तक्रारीमुळे वडगाव ग्रामपंचायतीच्या कारभारातील अनियमितता चव्हाट्यावर आली असून, विभागीय आयुक्त यावर काय पावले उचलतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ,दिग्रस 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!