प्रतिनिधी यवतमाळ -/ वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज घोटाळ्याची यवतमाळ तालुक्यातील 16 किलोमीटरची ईटीएस मोजणी अजूनही रखडलेली आहे. दोन वर्षांपूर्वी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिलेल्या आदेशावरून ईटीएस मोजणी सुरू करण्यात आली होती. मात्र जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे शेवटच्या टप्प्यातील ही मोजणी अजूनही रखडलेली असल्यामुळे गौण खनिज घोटाळ्याच्या अंतिम अहवालावर जिल्हा प्रशासनाने अंत्यसंस्कार केले काय? असा प्रश्न उपस्थित करीत तक्रारकर्ते अमोल कोमावार यांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन रेल्वे प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात मुरूम व अन्य गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आले असून, त्याची शासनाला देय रॉयल्टी भरण्यात आली नसल्याचा आरोप कोमावार यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून प्रत्यक्ष उत्खननाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी ईटीएस मोजणीचे आदेश देण्यात आले होते. मात्र आदेश होऊन सुमारे दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी संपूर्ण प्रकल्पाचा अंतिम मोजणी अहवाल अद्याप प्रलंबित आहे. यवतमाळ तालुक्यातील कारली ते गोधनी या सुमारे 17 किलोमीटरच्या पट्ट्यातील ईटीएस मोजणी अहवालात 8 लाख 90 हजार 506.91 ब्रास उत्खनन झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. 700 रुपये प्रतिब्रास दराने त्याची किंमत सुमारे 62 कोटी 33 लाख रुपये होते. हा अहवाल अंदाजे स्वरूपाचा असल्याचे नमूद असल्याने प्रत्यक्ष उत्खननाचे प्रमाण यापेक्षा अधिक असण्याची शक्यता कोमावार यांनी व्यक्त केली आहे. त्यातच यवतमाळ तालुक्यातील उर्वरित 16 किलोमीटर भागाची मोजणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याने संपूर्ण प्रकरणाचा अंतिम आर्थिक आकडा स्पष्ट झालेला नाही.
🔥प्रशासनाची भूमिका संशयास्पद
या प्रकरणात 27 ऑगस्ट 2020 पासून महसूल विभागाच्या विविध अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्याचे कोमावार यांनी निवेदनात नमूद केले आहे. विधानसभा उपाध्यक्षांच्या आदेशानंतर मोजणी प्रक्रिया सुरू झाली; मात्र तक्रारकर्त्याला मोजणी व संबंधित बैठकींपासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तांत्रिक बाबींवर अद्याप समाधानकारक चर्चा झालेली नसून, रेल्वे विभागाकडून आवश्यक माहिती मागविणे, शासनाचा बुडालेला महसूल वसूल करणे तसेच संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याबाबतही प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
🔥थातूरमातूर अहवाल
कोट्यावधी रुपयांचा गौण खनिज घोटाळा झालेला असताना अहवाल मात्र थातूरमातूर स्वरूपाचा आहे.ईटीएस मोजणीदरम्यान मूळ जमीन पातळीची माहिती उपलब्ध नसणे, उत्खननाच्या ठिकाणी पाणी साचलेले असणे आदी तांत्रिक अडचणींचा उल्लेख काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे आधुनिक तांत्रिक यंत्रणेच्या सहाय्याने स्वतंत्र तज्ज्ञांच्या उपस्थितीत आणि तक्रारकर्त्याच्या समक्ष मोजणी करून अंतिम अहवाल तयार करावा, अशी मागणी कोमावार यांनी केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनात जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना तातडीने अंतिम ईटीएस मोजणी अहवाल सादर करण्याचे आदेश द्यावेत, तसेच शासनाचा बुडालेला महसूल वसूल करून संबंधित कंत्राटदार व इतर जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली