🔥सेलूत पोषण अभियानाचा समारोपीय कार्यक्रम उत्साहात; उत्कृष्ट सेविका व मदतनीसांचा गौरव
सेलू -/ माता आणि बालकांचे आरोग्य, पोषणाचे महत्त्व तसेच महिलांचे सक्षमीकरण यांचा संदेश देत येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने पोषण अभियानाचा समारोपीय कार्यक्रम उत्साहात पार पडला. स्थानिक शिवपार्वती सभागृहात आयोजित या कार्यक्रमात पोषण गीत, आरोग्यविषयक जनजागृती, विविध विषयांवरील प्रदर्शनी आणि गोदभराई सोहळ्याच्या माध्यमातून पोषणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका व मदतनीसांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हा परिषद वर्धा येथील महिला व बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसंगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राम वरठी, संरक्षण अधिकारी अतुल चौधरी, आरोग्य विस्तार अधिकारी गजाननराव धानकुटे, राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर विजय वैद्य आणि जिल्हा समन्वयक संदीप डंभारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावरील पुस्तक देऊन करण्यात आले. अंगणवाडी सेविका प्रिया खंडाते यांनी स्वागत नृत्य सादर केले. त्यानंतर अंगणवाडी पोषण आरती आणि ‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ या प्रतिज्ञेद्वारे पोषण व बालसंगोपनाबाबत सामूहिक बांधिलकी व्यक्त करण्यात आली.
🔥१७६ अंगणवाडी केंद्रांत जनजागृती.!
बाल विकास प्रकल्प अधिकारी वंदना नागोसे यांनी प्रास्ताविकातून ९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत सेलू तालुक्यातील १७६ अंगणवाडी केंद्रांमध्ये राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची विस्तृत माहिती दिली. अंगणवाडी सेविकांनी विविध वेशभूषांमध्ये पोषण अभियान गीताचे सादरीकरण केले. यावेळी अभियानाच्या पाच संकल्पनांवर आधारित भव्य प्रदर्शनीही मांडण्यात आली. गरोदर मातांसाठी आयोजित गोदभराई कार्यक्रमात पतीच्या हस्ते ओटी भरण्यात आली. मातृत्व, कुटुंबाचा सहभाग आणि माता-बाल आरोग्याचा संदेश देणारा हा सोहळा कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला.
🔥आरोग्य, महिला संरक्षण आणि बालविकासावर मार्गदर्शन.!
मनीषा कुरसंगे यांनी माता, बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्याचे महत्त्व स्पष्ट करत पोषणविषयक उपक्रम वर्षभर सातत्याने राबविण्याचे आवाहन केले. डॉ. वरठी यांनी महिलांचे आरोग्य आणि ‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या विषयावर मार्गदर्शन केले. अतुल चौधरी यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी असलेल्या कायद्यांची माहिती देत जनजागृती केली.
विजय वैद्य यांनी ‘मैत्री बालमनाशी, नवचेतना, आधारशिला’ या विषयांतर्गत गर्भधारणेपासून ते शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून होणाऱ्या शिक्षण व विकासाचे महत्त्व विशद केले.
🔥उत्कृष्ट कामाचा गौरव.!
अंगणवाडी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पर्यवेक्षिका सुषमा अंभोरे, शिल्पा मलकवाडे आणि लक्ष्मी घोळसे यांच्यासह उत्कृष्ट अंगणवाडी सेविका व मदतनीसांना प्रशस्तीपत्र देऊन याप्रसंगी सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक अरविंद भोसकर यांनी केले, तर अंगणवाडी सेविका योगिनी पराते यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कनिष्ठ सहाय्यक शिरसकर तसेच सेलू तालुक्यातील सहाही सर्कलमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सहकार्य केले.