हिंगणघाटात एमडी ड्रग्जसह ३.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

🔥हिंगणघाटात एमडी ड्रग्जसह ३.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

🔥डीबी पथकाची पहाटे कारवाई; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

हिंगणघाट -/ शहरातील संत ज्ञानेश्वर वार्ड परिसरात हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) पथकाने पहाटेच्या सुमारास कारवाई करीत मॅफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थासह एकूण ३ लाख ३४ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश अनिल चिताडे (वय २८, रा. सेंट्रल वार्ड, हिंगणघाट, सध्या संत ज्ञानेश्वर वार्ड) आणि अविनाश सुरेशराव लांबे (वय ३०, रा. सेंट्रल वार्ड, हिंगणघाट) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.१५ ते ५.३० वाजताच्या दरम्यान हिंगणघाट डीबी पथक रात्रीची गस्त घालत असताना गुप्त बातमीदाराकडून अंमली पदार्थाबाबत विश्वसनीय माहिती मिळाली. त्यानंतर पंचांना बोलावून पोलिसांनी संत ज्ञानेश्वर वार्ड परिसरात सापळा रचला. संशयितांची तसेच वाहनांची कायदेशीर झडती घेतली असता एका प्लास्टिकच्या पुडीत ७.०९ ग्रॅम वजनाचा मॅफेड्रोन हा अंमली पदार्थ आढळून आला. त्याची किंमत २९ हजार ९७० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

या कारवाईत अंमली पदार्थासह एमएच ०२ सीडी १९७६ क्रमांकाची सिल्व्हर रंगाची हुंडाई आय-२० कार (किंमत २ लाख ५० हजार रुपये), पाच हजार रुपये रोख आणि तीन मोबाईल फोन असा एकूण ३ लाख ३४ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी हिंगणघाट पोलीस स्टेशनमध्ये अप.क्र. १७३९/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(क), २१(ब) व २९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा पळनाटे तसेच डीबी पथकातील पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पोलीस नाईक राजेश शेंडे, पोलीस शिपाई आशिष नेवारे व मंगेश वाघमारे यांनी केली.

सचिन वाघे साहसिक News-24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!