गांधी चौकातील ‘चिंतामणी अर्बन’कडून ठेवीदारांची फसवणूक; मुदत संपूनही आरडीचे पैसे देण्यास नकार

0

🔥गांधी चौकातील ‘चिंतामणी अर्बन’कडून ठेवीदारांची फसवणूक; मुदत संपूनही आरडीचे पैसे देण्यास नकार

🔥​यवतमाळात पतसंस्थांच्या गोंधळामुळे ठेवीदारांचे लाखो रुपये अडकले; दामदुप्पट आमिषाचा पर्दाफाश

​यवतमाळ -/ शहरातील गांधी चौक परिसरात कार्यरत असलेल्या चिंतामणी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा भोंगळ आणि संशयास्पद कारभार चव्हाट्यावर आला आहे. या पतसंस्थेने ठेवीदारांच्या मुदत संपलेल्या ठेवी आणि आरडीची रक्कम परत करण्यास स्पष्ट नकार दिल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आर्णी रोड येथील ठेवीदार नरेंद्र अग्रवाल यांनी सलग नऊ महिने भरलेली आरडी मुदतपूर्तीनंतर काढण्यास गेले असता संस्थेने पैसे देण्यास नकार दिला. या प्रकारामुळे यवतमाळ शहरातील इतरही शेकडो सामान्य ठेवीदारांचे लाखो रुपये अडकल्याची भीती व्यक्त होत असून, दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून गोरगरीबांची लूट करणाऱ्या पतसंस्थांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कष्टाच्या कमाईतून भविष्याच्या तरतुदीसाठी सामान्य नागरिक पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवतात. मात्र, या विश्वासाचा गैरफायदा घेत ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रकार यवतमाळ शहरात उघडकीस आला आहे. शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या गांधी चौकातील ‘चिंतामणी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ने ठेवीदारांचे मुदत संपलेले पैसे परत करण्यास चक्क नकार दिल्याने ठेवीदार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात चिंतामणी अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, सहकार विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ​यवतमाळ शहरातील आर्णी रोड परिसरात राहणारे नरेंद्र अग्रवाल यांनी आपल्या कष्टाच्या पैशातून चिंतामणी अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये रिकरिंग डिपॉझिट (आरडी) खाते उघडले होते. त्यांनी नियमितपणे सलग नऊ महिन्यांपर्यंत या खात्यात पैसे जमा केले. आरडीची ठरलेली मुदत पूर्ण झाल्यानंतर आपली हक्काची रक्कम काढण्यासाठी (विड्रॉल) अग्रवाल हे गांधी चौकातील सोसायटीच्या कार्यालयात गेले होते. मात्र, संस्थेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना पैसे परत देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. हक्काचे पैसे मिळत नसल्याने हतबल झालेल्या अग्रवाल यांच्यासह इतर ठेवीदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ​ही केवळ एका ठेवीदाराची व्यथा नसून, यवतमाळ शहरातील अशाच शेकडो सर्वसामान्य नागरिकांच्या लाखो रुपयांच्या आरड्या आणि मुदत ठेवी या पतसंस्थेत अडकून पडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रोज मजुरी करणारे, छोटे व्यापारी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांनी आपल्या मुलांचे शिक्षण, लग्न किंवा आजारपणाच्या खर्चासाठी या संस्थेत पैसे गुंतवले होते. आता संस्थेनेच हात वर केल्याने या सर्व ठेवीदारांच्या पायाखालची जमीन सरकली असून, आपले कष्टाचे पैसे परत मिळणार की नाही, या चिंतेने त्यांना ग्रासले आहे. ​सध्या यवतमाळ जिल्ह्यात गल्लोगल्ली आणि बोळाबोळात अशा अनेक बोगस आणि अनियंत्रित पतसंस्थांचे पेव फुटले आहे. या सोसायट्यांचे एजंट आणि पदाधिकारी सर्वसामान्य नागरिकांना गाठून बँकांपेक्षा जास्त व्याजदराचे तसेच काही वर्षांत पैसे ‘दामदुप्पट’ करून देण्याचे आकर्षक आमिष दाखवतात. सामान्य नागरिक या भुलथापांना बळी पडून आपली जमापुंजी या संस्थांच्या स्वाधीन करतात. सुरुवातीला काही दिवस विश्वास संपादन केल्यानंतर, जेव्हा ठेवीदार आपले पैसे परत मागण्यास जातात, तेव्हा आर्थिक अडचणीचे कारण सांगून किंवा उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांची बोळवण केली जाते.

​चिंतामणी अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या या मनमानी कारभारामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या विश्वासार्हतेला मोठा तडा गेला आहे. ज्या उद्देशाने सहकार चळवळ उभी राहिली, तिलाच हरताळ फासण्याचे काम अशा संस्थांकडून सुरू आहे. ठेवीदारांच्या पैशांचा नेमका विनियोग कुठे झाला? संस्थेने नियमांचे उल्लंघन करून कर्जांचे वाटप केले का? की ठेवीदारांच्या पैशांवर संचालक मंडळानेच डल्ला मारला? असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. ​एकीकडे गोरगरीब ठेवीदार आपल्याच पैशांसाठी पतसंस्थेच्या उंबरठ्यावर हेलपाटे मारत असताना, दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा मात्र सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे. सहकार विभागाचे अधिकारी या बोगस आणि नियमबाह्य चालणाऱ्या पतसंस्थांवर वेळीच अंकुश का ठेवत नाहीत, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या चिंतामणी अर्बन सोसायटीच्या संचालक मंडळावर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, तसेच संस्थेची मालमत्ता जप्त करून ठेवीदारांचे अडकलेले लाखो रुपये व्याजासह परत मिळवून द्यावेत, अशी जोरदार मागणी यवतमाळकरांमधून होत आहे. आता प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ठेवीदारांना न्याय देते की अशा लूट करणाऱ्या संस्थांना पाठीशी घालते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!