नगरसेवक गेले पुरीला दर्शनाला; परतले ६-६-५ च्या सत्तास्वप्नांसह.!

0

🔥नगरसेवक गेले पुरीला दर्शनाला; परतले ६-६-५ च्या सत्तास्वप्नांसह.!🔥हीच ती जगन्नाथाच्या दर्शनातील लाभार्थ्यांची यादी

🔥भाजपच्याच नगरसेवकाने मांडला भाजपला बाजूला ठेवण्याचा फॉर्म्युला; पुरीच्या सहलीत रंगली सेलूच्या सत्तेची खलबते, विकासापेक्षा खुर्चीचीच चिंता.!

 सेलू -/ नगरसेवक गेले होते जगन्नाथाच्या दर्शनाला; मात्र दर्शनापेक्षा स्थानिक राजकारणातील सत्तेची गणितेच अधिक रंगली, अशी चर्चा सध्या शहराच्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या एका नगरसेवकानेच भाजपला बाजूला ठेवून सत्तेचा कथित ६-६-५ फॉर्म्युला मांडल्याची रंगतदार चर्चा आहे. त्यामुळे ‘नगरसेवक घुमने गये पुरी, इच्छाये रह गयी अधुरी!’ अशी उपरोधिक टिप्पणी आता शहरात ऐकायला मिळत आहे.

सेलू नगरपंचायतीच्या सभागृहातील संख्याबळ पाहिले तर भाजपचे ६, सेलू सुधार आघाडीचे ५, साहसिक जनशक्ती संघटनेचे २, काँग्रेसचे २, शिवसेनेचे १ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे नेतृत्व आहे. अशा या राजकीय समीकरणात दोन नगरसेवकांचा अपवाद वगळता बहुतांश नगरसेवक आपल्या कुटुंबीयांसह नुकतेच जगन्नाथ पुरीच्या दर्शनासाठी गेले होते. ही सहल नेमकी कोणी आयोजित केली, कोणत्या उद्देशाने झाली, हा स्वतंत्र चर्चेचा विषय; मात्र पुरीत घडल्याचे सांगितले जाणारे राजकीय नाट्य आता सेलूत गुलाबी थंडीत चांगलाचं चर्चेचा विषय ठरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सहलीदरम्यान एका भाजप नगरसेवकाच्या मनात राजकीय समीकरणांची गणिते चांगलीच घोळू लागली. दोन घुट घेतल्यानंतर चर्चेला रंग चढला आणि थेट सर्व गटप्रमुखांसमोर सत्तावाटपाचा कथित प्रस्ताव मांडण्यात आला. विशेष म्हणजे, या प्रस्तावात भाजपलाच बाजूला ठेवून ६-६-५ असा फॉर्म्युला मांडल्याची चर्चा आहे.

या फॉर्म्युल्याचे गणितही काही कमी मजेशीर नव्हते. पहिले सहा नगरसेवक पूर्वीपासून ‘सत्ता’सुंदरीचा आस्वाद घेतलेल्या गटासाठी, दुसरे सहा वरचष्मा असलेल्या आघाडीच्या ‘मठ्ठा’मार नेत्यांसाठी आणि उरलेले पाच प्रस्ताव मांडणाऱ्या अर्ध्या मेंदूच्या कथित राजकीय नेतृत्वासाठी.! म्हणजे भाजपच्या चिन्हावर निवडून येऊन भाजपलाच सत्तेच्या सारीपाठातून बाहेर ठेवण्याची ही ‘अनाठायी’ कल्पना.! त्यामुळे ‘घरका भेदी लंका ढाये’ या म्हणीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. एव्हाना झिंग चढलेल्या ‘मामा आणि भासा’ला प्रश्न पडला की आमचं कस्स्स.. आम्ही मागच्या की पुढच्या दारातन यायचं, तेव्हा आपणास अस्वीकृत करणार तरी कोण बावा.. दोघंही अवघड जागेचं दुखणं जरी असले, तरी सत्तापक्षात ‘झारीतील शुक्राचार्य’ अशी ख्याती आहे.

या कथित राजकीय चर्चेची रंगत एवढी वाढली की, उपस्थितांना भविष्यातील सत्तेची स्वप्नेही पडू लागली. मात्र ‘रात्र थोडी अन् सोंगे फार’ अशी परिस्थिती झाली. रात्रीच्या चर्चेतील ‘या’ प्रस्तावाला काहींनी केवळ विनोद तर काहींनी चखणा म्हणून घेतल्याचे सांगितले जाते. परत सकाळी नाश्त्याच्या टेबलावर पुन्हा ६-६-५ चा विषय निघताच उपस्थितांमध्ये हशा पिकल्याची चर्चा आहे. काल रात्रीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला सकाळी विनोदाचा विषय ठरला की राजकीय महत्त्वाकांक्षेचा, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच.!

दरम्यान, शहरातील ‘वट्टा’ अन् कट्टयांवरही ‘या’ कथित किस्स्याची चर्चा रंगू लागली आहे. एरवी स्थानिक राजकारणात आपापली गणिते मांडणारे काही लोक आता पुरीच्या सहलीतील चर्चेवरूनही राजकीय अंदाज बांधत आहेत. निवडणुका जवळ येताच कोण कोणासोबत जाणार, कोण कोणाला बाजूला करणार आणि कोणाच्या मनात कोणती खुर्ची आहे, याची उत्सुकता वाढली आहे.

🔥मात्र खरा प्रश्न ६-६-५ चा नाही, तर सेलूच्या विकासाचा आहे.!

नगरपंचायतीच्या राजकारणात सत्तेची गणिते मांडण्यासाठी एवढी ऊर्जा खर्च होत असेल, तर शहरातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी तीच तत्परता का दिसत नाही? रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नाल्या, पथदिवे आणि दर्जेदार विकासकामे यांसारखे प्रश्न आजही नागरिकांसमोर आहेत. काही नगरसेवकांच्या कामकाजाबाबत ठेकेदारी आणि विकासकामांच्या गुणवत्तेवरूनही नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या आरोपांची निष्पक्ष चौकशी आणि कामांचा दर्जा तपासणे आवश्यक आहे.

शहराचा विकास हा नगरसेवकांचा प्राधान्यक्रम असायला हवा की सत्तेच्या खुर्चीचे गणित? जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी शहराच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी सहलीतच सत्तेची समीकरणे जुळवत असतील, तर मतदारांनी त्यांचा जाब विचारणे स्वाभाविक आहे.

🔥पुरीच्या समुद्रकिनारी सत्तेची स्वप्ने रंगविणे सोपे; पण सेलूच्या रस्त्यावर उतरून विकासाची कामे करणे कठीण.!

आता सेलूकरांनीच ठरवायचे आहे की, त्यांना ६-६-५ च्या सत्तेचे राजकारण हवे की शहराच्या विकासाचे उत्तरदायित्व स्वीकारणारे नगरसेवक.!(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!