🔥दोनदा भूमिपूजन, चार वर्षांचा वनवास.! आंजी-मांडवा मार्गावर विकास हरवला खड्डयांत
🔥विकासाच्या पाट्या झळकल्या; नागरिकांचा प्रवास मात्र खड्डयांतूनच.!!
🔥आंजी (मोठी) ते मांडवा मार्गावरील सिमेंट रस्त्याचे काम चार वर्षांपासून रखडले; नाल्यांचे बांधकामही अर्धवट – नागरिकांचा संताप अनावर
आंजी (मोठी) -/ विकासाच्या घोषणा, भूमिपूजनाचे सोहळे आणि आश्वासनांचा गाजावाजा… मात्र प्रत्यक्ष कामाच्या वेळी प्रशासन आणि कंत्राटदारांची उदासीनता.! आंजी (मोठी) ते मांडवा मार्गावरील आंजी लगतच्या सिमेंट रस्त्याची अवस्था पाहता विकासाच्या दाव्यांचे वास्तव खड्डयांत हरवल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, चार वर्षांपूर्वी दोन-दोन वेळा भूमिपूजन होऊनही रस्त्याचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे नागरिकांना विकासाच्या नावाखाली खड्डे, धूळ आणि दगडधोंड्यांतूनच प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावरील सिमेंट रस्त्याचे काम रखडल्याने वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्यालगतच्या नाल्यांचे बांधकामही अपूर्ण असल्याने परिसरातील समस्यांमध्ये भर पडली आहे. धुळीचे लोट, उखडलेला रस्ता आणि ठिकठिकाणी निर्माण झालेले खड्डे यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. रोजच्या प्रवासात लहान-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
🔥भूमिपूजनाला मुहूर्त, कामाला मात्र नाही.!
लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत दोनदा भूमिपूजनाचे सोपस्कार पार पडले; मात्र त्यानंतर कामाने अपेक्षित गती घेतलीच नाही. विकासकामांच्या उद्घाटनाचे फलक आजही विकासाची साक्ष देत असले, तरी प्रत्यक्ष रस्त्याची दुरवस्था या घोषणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी पक्षातील अनेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी याच मार्गाने दररोज ये-जा करतात. तरीही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
रस्त्याचे काम नेमके कोणत्या कारणामुळे रखडले आहे? कंत्राटदाराची दिरंगाई आहे की संबंधित यंत्रणेचे नियंत्रण अपुरे पडत आहे? कामातील विलंबामागील कारणांबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने कामाची सद्यस्थिती, विलंबाची कारणे आणि काम पूर्ण करण्याची निश्चित कालमर्यादा सार्वजनिक करावी, अशी मागणी होत आहे.
आता नागरिकांना आश्वासनांचे गाजर नको, तर प्रत्यक्ष कामाची पूर्तता हवी आहे. आंजी लगतच्या सिमेंट रस्त्याचे तसेच रस्त्यालगतच्या नाल्यांचे बांधकाम तातडीने पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित आणि धुळमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा भूमिपूजनाच्या सोहळ्यांमधून रंगविलेला विकासाचा देखावा आणि प्रत्यक्षातील रस्त्याची दुरवस्था यातील तफावत अधिकच ठळक होत राहील.(क्रमशः)