वाघ शिकार प्रकरणी एकाला अटक; चार दात अन् तब्बल १७ नखे आरोपीकडून जप्त
By साहसिक न्यूज24
प्रतिनिधी/ वर्धा:
समुद्रपूर तालुक्यातील मौजा पवनगाव येथे उघडकीस आलेल्या वाघाची शिकार प्रकरणी वनविभागाने चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील महालगाव (खुर्द) येथून एकाला अटक केली आहे. वनविभागाने अविनाश भारत सोयाम (३४) या मुख्य आरोपीस अटक केली आहे. याच आरोपीने त्याच्या शेतातील झोपडीत वाघाची चार दात अन् तब्बल १७ नखे पुरवून ठेवली होती. ही वाघाची अवयवे वनविभागाने जप्त केली आहे.
तालुक्यातील महागाव (खुर्द) शेत शिवारात तारेच्या कुंपनात विद्युत प्रवाहित करून वाघाची शिकार करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीने वाघाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच भागातील एका पडीक शेतजमिनीवर वाघाचा मृतदेह नेला. पण तेथे यश न आल्याने आरोपीने थेट चंद्रपूर जिल्ह्याची सीमा ओलांडून वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मौजा पवनगाव येथील झुडपी जंगल वाघाच्या मृतदेहासह गाठले. याच ठिकाणी आरोपीने वाघाच्या मृतदेहाचे तुकडे फेकून देत यशस्वी पळ काढला होता.
१४ तुकड्यातील वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने वनविभागही ॲक्शन मोडवर आला. तब्बल १४ तुकड्यांत वाघाचा मृतदेह सापडला. पण वाघ नख आणि दात बेपत्ता असल्याचे लक्षात येताच नक्कीच हा प्रकार शिकारीचा असल्याचा अंदाज वनविभागाकडून बांधण्यात आला. त्यानंतर वनविभागाने मुख्य आरोपी अविनाश भारत यास अटक करून वनकोठडी मिळविली. बुधवारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील महालगाव (खुर्द) गाठून वाघाची चार दात व १७ नखे जप्त केली.
दरम्यान, आरोपी अविनाश सोयाम याने त्याच्याच महालगाव शिवारातील शेतातील झोपडीत वाघाची चार दात व तब्बल १७ नखे कुणालाही सहज मिळू नये या हेतूने पुरविली होती. ती वनविभागाने जप्त केली असली तरी अविनाश हा वाघाच्या या अवयवांची कुणाला विक्री करणार होता याचा शोध सध्या वनविभागाचे अधिकारी घेत आहेत. या प्रकरणात या आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वनविभागातील खात्रीलायक सूत्रांकडून वर्तविली जात आहे.