🔥हिंगणा पंचायत समितीतील गंभीर प्रकार — रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड.
हिंगणा -/पंचायत समिती अंतर्गत तसेच परिसरालगत असलेल्या रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचा अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
डॉक्टर व कर्मचाऱ्यांची अधिकृत उपस्थितीची वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ अशी असताना, प्रत्यक्षात सकाळी नऊ वाजेपर्यंत दवाखान्यात कोणीही उपस्थित राहत नसल्याचे वास्तव उघड झाले आहे.
याचा सर्वाधिक फटका दैनिक मजुरीवर काम करणाऱ्या कामगार वर्गाला बसत आहे. सकाळी उपचार करून वेळेत कामावर जाण्याच्या उद्देशाने आलेल्या रुग्णांना मजुरी गमावून तासनतास डॉक्टर व कर्मचाऱ्यांची वाट पाहावी लागत आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या संपूर्ण बेपर्वाईचा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते कैलाश कांबळे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला असून, संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
आरोग्य सेवा हा नागरिकांचा मूलभूत हक्क असताना, प्राथमिक आरोग्य केंद्रातच अशी उघडपणे बेपर्वाई होत असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
विशेष म्हणजे, नागपूर जिल्हा परिषद व पंचायत समिती हिंगणा यांचा कार्यकाळ संपल्यामुळे सध्या कोणताही जबाबदार पदाधिकारी या गंभीर बाबीकडे लक्ष देताना दिसत नाही.
सर्वांचे लक्ष आता “पक्ष कोणाला तिकीट देणार?”, “निवडणूक जिंकली तरच जबाबदारी” या राजकीय गणितांमध्ये अडकले असल्याचे चित्र आहे.
निवडणूक येईपर्यंत नागरिकांचे आरोग्य दुर्लक्षितच राहणार का? की प्रशासन आता तरी जागे होऊन रुग्णांच्या हक्कासाठी ठोस पावले उचलणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.