Crime गावठी कट्ट्याचे थैमान : जळगाव, धुळे, नंदुरबार हादरले

0

Byसाहसिक न्यूज24
यावल/फिरोज तडवी:
धुळे , नंदुरबार, जळगांव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सापडणारे गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसांनी पोलीस प्रशासनासमोर आवाहन उभे केले आहे. तलवारी आणि गावठी पिस्तुल खरेदी विक्रीचे प्रमाण कोणत्या कारणांमुळे वाढते आहे याचा शोध पोलीस प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे. चोपडा शहरातील एका आठवड्यात सापडलेले 18 गावठी पिस्तुल ही घटना गांभिर्याने घेण्याची आवश्यकता आहे.
धुळे-नंदुरबार-जळगाव तिन्ही जिल्ह्यांची सामाजिक-भौगोलिक परिस्थिती या तिन्ही जिल्ह्यांना लागून असलेल्या गुजरात, मध्यप्रदेश राज्याच्या सिमा आणि मागील दशकात महामार्गाचा झालेला विकास याचा फायदा सामान्य नागरिकांना होतो आहे हे मान्य केले तरी याचा गैरफायदा समाजातील अपप्रवृत्ती सुद्धा घेत आहेत, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. योगायोगाने या तिनही जिल्ह्यांना अतिशय कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक लाभलेले आहेत. जळगांव जिल्ह्याचे प्रविण मुंडे, नंदुरबारचे पी.आर.पाटील, आणि धुळे जिल्ह्याचे एस.पी. प्रविणकुमार पाटील या त्रिमूर्तींनी आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूरी सोडलेली नाही. आपल्या जिल्ह्यात अतिशय धडाकेबाज पद्धतीने त्याच प्रमाणे संवेदनशिल मार्गाने देखील गुन्ह्यांची उकल करत गुन्हेगारी विश्वात वचक निर्माण केला आहे. असे असले तरी गुन्हेगार ‘माळा’ जपत बसून नसतात. अवैध मार्गाने व्यवसाय करणारे आपला व्यवसाय लपून-छपून सुरूच ठेवतात आणि काही प्रमाणात पोलीसांच्या आशिर्वादानेही अवैध धंदे सुरू असतात. मागील आठवड्यात जळगांव जिल्ह्यात सहा गावठी पिस्तूल व 30 जिवंत काडतुसे विक्रीसाठी आणलेली असतांना चोपडा पोलीसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर मुद्देमालासह गुन्हेगारांना पकडण्यात यश मिळविले. एक आठवडा होत नाही तोच पून्हा 12 पिस्तुल आणि 5 काडतुसे चोपडा येथे जप्त करण्यात आली. अवघ्या एका आठवड्यात 18 पिस्तूल व 35 काडतुसे एकट्या चोपडा शहरात पकडण्यात आल्याने उत्तर महाराष्ट्रात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईसाठी चोपडा पोलीसांचे कौतुक केले पाहिजे. याच महिन्यात धुळे पोलीसांनी चार पिस्तूलसह काडतुसे जप्त करत गुन्हेगारांना अटक केली आहे. अर्थात ही पिस्तुले तयार होतात ती सातपुड्याच्या पर्वत रांगा असलेल्या गावांमध्ये, मध्यप्रदेशातील उमर्टी, दहिया सारख्या गावांमध्ये चोरून लपून ही पिस्तुले बनविली जातात. 12 ते 15 हजार रूपयात विकली जाणारी ही पिस्तुले खरेदी करणारा वर्ग कोणता ? याचा विचार पोलीस प्राशसनाने करण्याची आवश्यकता आहे. यावल व चोपडा तालुक्याला लागून असलेला लंगडा आंबा, पाल या अभयारण्यात व पर्वत रांगाच्या पायथ्याशेजारी असलेली मध्यप्रदेशीची सिमा यामुळे गावठी पिस्तुल विकणार्‍यांना या राज्यातून त्या राज्यात जाण्यास संधी मिळते. तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर, बोराडी, पळासनेर गावाजवळील जंगलांमधून थेट मध्यप्रदेशात जाण्याची व्यवस्था असल्याने अवैध मद्य, भांग, गांजा व गावठी पिस्तुल व तलवारी यांचा व्यवसाय चालतो. पोलीसांना या सर्व बाबी व ठिकाणे माहित आहेत तरी सुद्धा सखोल कारवाई का होत नाही ? असा प्रश्न नागरीकांमधून चर्चीला जातो. विशेष म्हणजे या शस्त्राचा माध्यमातून वन्यपशुंची शिकार देखील केली जाते का ? याचाही संबंध जोडून तपास करण्याची गरज आहे. कारण जळगांव शहरात भवानी पेठेतील दुकानावर छापा टाकून घोड्यासह आठ वन्य प्राण्यांचे 347 प्रकारचे अवशेष नुकतेच जप्त करण्यात आले. धुळे शहरात सकाळी 6 ते आठ वाजेच्या आत लाहुरी, तितूर, घोरपड, मांडूळ साप विकणारे अंगावर शाल पांघरून विक्रीसाठी येतात. विशेषतः यात स्त्रीया असतात. शहरामध्ये वाढणारे गुंड यांनाही पिस्तुल बाळून ‘दादा’ होण्याची एक नवी फॅशन निर्माण झाली आहे. अवैध व्यवसाय, त्यासाठी संरक्षण, दादागिरी, लुट करणारे यांचेसह स्वतःला दादा मिरविणार्‍यांना या अवैध पिस्तुलाची गरज भासते. आणि त्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा पिस्तुल व तलवारी खरेदी करणारा वर्ग निर्माण झाल्याने वारंवार अशा प्रकारचे पिस्तुले आणि तलवारी विक्री करणारे सापडतात. यावर नियंत्रण बसविण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील तिन्ही जिल्ह्यांतील पोलीस अधिक्षकांनी एक स्वतंत्र पथक निर्माण करून या पिस्तुलांची निर्मिती करणारे, विक्री करणारे याच्या मुळापर्यंन्त पोहचण्याची आवश्यकता आहे. वनविभागाने देखील यात सहकार्य करावे, झोपा न काढता रात्रीच्या ड्युटी प्रामाणिकपणे केल्यास वन्यपशुंच्या तस्करीवर देखील पायबंद बसू शकतो. तिनही जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने गावठी पिस्तुलांची गांभिर्याने दखल घ्यावी, एव्हढेच…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!