आर्णीत २० हजार ब्रास रेतीचे डोंगर उभे, तरीही महसूल यंत्रणेकडून केवळ ३ हजार ब्रासवर बोळवण

0

🔥आर्णीत २० हजार ब्रास रेतीचे डोंगर उभे, तरीही महसूल यंत्रणेकडून केवळ ३ हजार ब्रासवर बोळवण

🔥कोट्यवधींच्या दरोड्यावर दोन कोटींच्या दंडाची मलमपट्टी करून तस्करांना खुली सूट

​यवतमाळ -/ नदीपात्रांची लूट करून नैसर्गिक साधनसंपत्ती ओरबाडणाऱ्या रेतीमाफियांना रोखण्याऐवजी, त्यांच्यावर ‘दंडात्मक कारवाई’चा अधिकृत शिक्का मारून चोरीचा माल विकण्याचा खुला परवाना देण्याचा संतापजनक प्रकार आर्णी तालुक्यात उघडकीस आला आहे. आयता प्रकल्प क्षेत्रात तब्बल २० हजार ब्रासपेक्षा अधिक रेतीचे अनधिकृत डोंगर उभे असताना, स्थानिक महसूल यंत्रणेने डोळ्यांवर मलिद्याची पट्टी बांधून केवळ ३ हजार ब्रास अतिरिक्त उपशाचे नाममात्र दाखले दिले. या प्रकरणात २ कोटी ३८ लाख रुपयांचा दंड ठोठावून उर्वरित कोट्यवधींच्या बेकायदेशीर साठ्यावर प्रशासनाने पांघरूण घातल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या संघटित लुटीविरोधात तक्रारदार रजनीकांत बोरले यांनी थेट मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल केल्याने महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ​शासनाने प्रत्येक रेतीघाटासाठी उपशाची ठरावीक मर्यादा आणि नियमावली आखून दिली आहे. मात्र, आर्णी तालुक्यात या नियमांचे धिंडवडे काढले गेले. आयता प्रकल्प परिसरात क्षमतेच्या अनेक पटींनी नियमबाह्य उपसा झाला. प्रत्यक्षात घटनास्थळावर २० हजार ब्रासपेक्षा जास्त रेतीचे महाकाय डोंगर उघड्या डोळ्यांनी दिसत असताना, आर्णीचे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी संगनमताने पंचनाम्यात केवळ तीन हजार ब्रास अतिरिक्त उपसा दाखवला. या तडजोडीतून केवळ २ कोटी ३८ लाखांचा दंड आकारण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, दंडाची ही रक्कम भरून उर्वरित कोट्यवधी रुपयांची अवैध रेती बाजारात विकण्याचा कायदेशीर मार्गच महसूल यंत्रणेने तस्करांना मोकळा करून दिला. म्हणजेच, चोरीच्या मालावर नाममात्र दंड आकारून त्याला अधिकृत मान्यता देण्याचा हा प्रकार ठरल्याने रेती तस्करांचे मनोबल गगनाला भिडले आहे.

विशेष म्हणजे, यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडे या गंभीर प्रकरणाची सविस्तर माहिती असूनही त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन या महाकाय साठ्याची शहानिशा करण्याचे साधे कष्टही घेतले नाहीत. डोळ्यांसमोर शासकीय महसुलावर कोट्यवधींचा दरोडा पडत असताना जिल्हास्तरीय सर्वोच्च यंत्रणेने दाखवलेले हे दुर्लक्ष संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

​केवळ आर्णीच नव्हे, तर झरी जामणी तालुक्यातील सत्तपल्ली येथेही अशाच प्रकारे कोट्यवधी रुपयांची रेती साठवून ठेवण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात रेती तस्करांचे साम्राज्य पसरलेले असताना महसूल यंत्रणा मात्र केवळ ‘खिशे गरम’ करण्यात मग्न असल्याचा थेट आरोप तक्रारदार रजनीकांत बोरले यांनी केला आहे. बोरले यांनी वारंवार कागदोपत्री पुरावे, छायाचित्रे आणि तक्रारी सादर करूनही ढिम्म महसूल प्रशासनाने त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले.

​शासकीय महसुलाचे कोट्यवधींचे नुकसान, नदीपात्रांची झालेली विदारक चाळण आणि तस्करांशी संगनमत करून मलिदा लाटणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका आता चव्हाट्यावर आली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री या ‘गेंड्याची चामडी’ पांघरलेल्या स्थानिक महसूल अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात, प्रत्यक्ष जागेवर उर्वरित १७ हजार ब्रासच्या साठ्यावर जप्तीची कारवाई होऊन जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)

            ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!