गणेशोत्सवाचा खर्च कमी करून अनाथ दर्शनच्या उपचारांसाठी ५३ हजारांची मदत!

0

🔥गणेशोत्सवाचा खर्च कमी करून अनाथ दर्शनच्या उपचारांसाठी ५३ हजारांची मदत!

🔥गर्जना गणेश मंडळाच्या युवकांचा माणुसकीचा जागर; आजीच्या डोळ्यांत तरळले अश्रू

सेलू  -/ गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव, सजावट आणि रोषणाई नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपण्याची संधीही असते, याचा प्रत्यय शहरातील वॉर्ड क्रमांक ४ मधील गर्जना गणेश मंडळाच्या युवकांनी दिला. अनाथ बालक दर्शन राऊत याच्या उपचारांसाठी मंडळाच्या युवकांनी गणेशोत्सवाचा खर्च कमी करून आणि नागरिकांकडून वर्गणी गोळा करत तब्बल ५३ हजार रुपयांची आर्थिक मदत उभी केली. संकटाच्या काळात मिळालेल्या या मदतीने दर्शनच्या आजीचे डोळे पाणावले.

🔥अपघातात दर्शन गंभीर जखमी.!

दहा वर्षीय दर्शन घराजवळ खेळत असताना मागून रिव्हर्समध्ये येणाऱ्या मालवाहू वाहनाचा काही भाग त्याच्या छातीला लागला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सेवाग्राम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. छातीवरील शस्त्रक्रियेसाठी पुढे नागपूर येथे हलविण्यात आले. दर्शनचे आई-वडील हयात नसल्याने त्याच्या संगोपनाची जबाबदारी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या आजीवर आहे. अशा परिस्थितीत नातवाच्या उपचारांचा वाढता खर्च पेलताना आजीसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले.

🔥युवकांनी पुढाकार घेत उभी केली मदत.!

दर्शनच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे समजताच गर्जना गणेश मंडळाच्या युवकांनी पुढाकार घेत सुरुवातीला १० हजार रुपयांची मदत केली. त्यानंतर वॉर्डातील नागरिकांकडून वर्गणी गोळा करून मदतीचा हात अधिक बळकट केला. या सामाजिक उपक्रमाला उत्साही बालगणेश मंडळ, सेलू आणि भाईराज बालगणेश मंडळ, सेलू यांचेही सहकार्य लाभले.

रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता मंडळाच्या युवकांनी दर्शनच्या घरी जाऊन त्याच्या आजीकडे आणखी ४३ हजार रुपये रोख सुपूर्द केले. अशा प्रकारे दर्शनच्या उपचारांसाठी एकूण ५३ हजार रुपयांची मदत करण्यात आली.

🔥मदतीने आजी भावुक; युवकांना दिले आशीर्वाद

नातवाच्या उपचारांसाठी धावून आलेल्या युवकांनी आणि नागरिकांनी दाखविलेल्या माणुसकीने आजी भावुक झाली. कठीण प्रसंगी मिळालेल्या या मदतीबद्दल तिने सर्वांचे आभार मानत युवकांना आशीर्वाद दिले. गणेशोत्सवाचा अनावश्यक खर्च टाळून एका गरजू बालकाच्या उपचारांसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या युवकांच्या या उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.

🔥दर्शनच्या उपचारांसाठी मदतीचे आवाहन

दर्शनच्या पुढील उपचारांसाठी अद्याप आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. दानशूर व्यक्तींनी शक्य ती मदत करून या चिमुकल्याच्या उपचारांना हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

(संपर्क : आशिष बुरांडे, सेलू,मोबाईल : +91 84080 27145)तसेच गर्जना गणेश मंडळाच्या सदस्यांशी संपर्क साधूनही मदत करता येईल.

ब्युरो रिपोर्ट साहसिक news-/24 सेलू वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!