हिंगणा -/शिक्षणाची ओढ व जिद्द असेल तर कोणतीही अडचण आडवी येऊ शकत नाही, याचे उत्तम उदाहरण वाडी येथील आदिवासी समाजातील गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थिनी कुमारी खुशी राजेंद्र करणाके हिने घालून दिले आहे. खुशीला उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस साठी प्रवेश मिळाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी दरवर्षी आर्थिक मदतीचे आश्वासन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देण्यात आले होते. या आश्वासनाला खऱ्या अर्थाने न्याय देत सलग तिसऱ्या वर्षीही खुशीला मनसेकडून दहा हजार रुपयांची मदत मिळाली आहे.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पारखी व जिल्हा सचिव दिपक ठाकरे यांच्या हस्ते ही मदत करण्यात आली. खुशीच्या शिक्षणाचा भार थोडा हलका व्हावा या हेतूने मनसेतर्फे चार वर्षांपर्यंत दरवर्षी दहा हजार रुपयांची मदत देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्याच संकल्पाचा भाग म्हणून यंदाही तिसऱ्या वर्षीची मदत दिली गेली असून त्यामुळे तिच्या कुटुंबाचा आर्थिक ताण कमी होण्यास मदत झाली आहे.
यावेळी बोलताना अनिल पारखी यांनी सांगितले की, “गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे ही काळाची गरज आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनीही पुढे येऊन अशा मुलांना आधार द्यावा, हीच खरी सेवा आहे.” दिपक ठाकरे यांनीसुद्धा अशाच भावना व्यक्त करत गरीब व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मदतीसाठी सर्वांनी समोर यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाला मनसे जिल्हा उपाध्यक्ष नागपूर अनिल पारखी, जिल्हा सचिव दिपक ठाकरे, विभाग प्रमुख धनराज ठाकरे, विभाग प्रमुख विठोबा घुरडे, खुशीचे वडील राजेंद्र करणाके आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत मदत देण्यात आल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पारखी हे नेहमीच समाजातील गोर-गरीब, होतकरू व वंचित घटकांसाठी मदत करण्यासाठी पुढे असतात. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात उज्ज्वल भवितव्याचे नवे दार उघडत आहे.