शाह हॉस्पिटलच्या समर्थनार्थ ३० रुग्ण जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारी; चौकशीची मागणी

0

🔥शाह हॉस्पिटलच्या समर्थनार्थ ३० रुग्ण जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारी; चौकशीची मागणी

यवतमाळ -/ शहरातील ‘शाह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर’ येथील डायलिसिस सुविधेवरून सध्या नवा वाद पेटला आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाने केलेल्या तक्रारीवरून जर हे जीवनदायी डायलिसिस केंद्र बंद पडले, तर उर्वरित रुग्णांच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल करत तब्बल ३० गरजू मूत्रपिंड (किडनी) रुग्णांनी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले आहे. या संदर्भात रुग्णांनी स्वाक्षरीसह जिल्हाधिकाऱ्यांना थेट निवेदन सादर करून तक्रारीची निःपक्ष चौकशी करण्याची आणि डायलिसिस केंद्र अविरत सुरू ठेवण्याची जोरदार मागणी केली आहे. 

पियुष दिलीप बजाज नावाच्या रुग्णाने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मिळणाऱ्या डायलिसिस उपचारांबाबत शाह हॉस्पिटलविरोधात तक्रार नोंदवली होती. मात्र, या तक्रारीमागे रुग्णालय प्रशासनाचा काही दोष नसून संबंधित रुग्णाचा वैयक्तिक द्वेष व गैरवर्तन कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या इतर रुग्णांनी आणि रुग्णालय प्रशासनाने केला आहे. 

​रुग्णांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित रुग्ण डायलिसिस कक्षात महिला रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे विनापरवानगी छायाचित्रे आणि व्हिडीओ काढत होता. त्यास डायलिसिस तंत्रज्ञ सुमित वाघमारे यांनी सक्त मज्जाव केला. यावरून संबंधित रुग्णाने वाद घालत थेट धमकावण्यास सुरुवात केली होती. तसेच, यापूर्वी ‘साई श्रद्धा हॉस्पिटल’ येथे डायलिसिस युनिट बंद पडल्यानंतर तेथील महिला तंत्रज्ञ शाह हॉस्पिटलमध्ये रुजू झाल्या होत्या. बजाज हे त्यांच्याकडूनच उपचार करून घेण्याचा अवाजवी हट्ट करत असत आणि त्यावरून सुमित यांच्याशी त्यांचा सातत्याने वाद होत होता. वैयक्तिक द्वेषापोटीच रुग्णालयाची व कर्मचाऱ्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी ही खोटी तक्रार रचण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. 

​या वादावर रुग्णालय संचालक डॉ. महेश आर. शाह यांनी जिल्हा समन्वयकांकडे लेखी खुलासा सादर केला आहे. डॉ. शाह यांनी स्पष्ट केले की, “गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हे रुग्णालय महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अत्यंत काटेकोर नियमांचे पालन करत हजारो रुग्णांना मोफत डायलिसिस सेवा देत आहे. डायलेसर, ट्युबिंग, औषधी यासह सर्व साहित्य शासनाच्या नियमांनुसार पूर्णपणे मोफत पुरवले जाते आणि बाहेरून साहित्य आणण्यास सक्त मनाई आहे.” 

​संबंधित रुग्णाच्या बाबतीत एका डायलिसिस सत्रादरम्यान मशीनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला होता. इतर मशिन्सवर आधीच रुग्ण उपचार घेत असल्याने रुग्णाचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून पूर्वकल्पना देऊन त्याला पर्यायी रुग्णालयात हलवण्याचा वैद्यकीय निर्णय घेण्यात आला होता. साई श्रद्धा हॉस्पिटलचे डायलिसिस युनिट बंद झाल्याने तेथील १३ रुग्णांचा अतिरिक्त भार शाह रुग्णालयावर पडला होता, तरीही कोणत्याही रुग्णाची गैरसोय होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त फेऱ्या वाढवून अविरत सेवा दिली, असेही डॉ. शाह यांनी खुलाशात नमूद केले आहे. ​जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ३० रुग्णांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, यवतमाळ शहरात मोजक्याच तीन ते चार ठिकाणी डायलिसिसची सोय उपलब्ध असून तिथे आधीच जागा अपुरी आहे. अशा परिस्थितीत एका व्यक्तीच्या वैयक्तिक वादापोटी किंवा खोट्या तक्रारीवरून जर हे केंद्र बंद झाले, तर उपचाराअभावी तडफडून आमचा जीव जाईल. रुग्णालयात जिल्हा समन्वयक डॉ. विशाल टवरी यांनी पाहणी केली असता सर्व रुग्णांनी मिळणाऱ्या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले होते. रुग्णांकडून कोणतेही अतिरिक्त पैसे उकळले जात नाहीत, तसेच औषधे, आयर्न व रक्तवाढीचे इंजेक्शन वेळेवर मिळतात. 

​या निवेदनावर रुग्णांच्या स्वाक्षऱ्या असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून खोट्या तक्रारदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांकडेही प्रतिलिपी पाठवून करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!