🔥अझीम प्रेमजी विद्यापीठ,बंगलोर च्या विद्यार्थीनी पूजा हेलुंडे यांनी विद्यार्थ्यांना दिला यशाचा मूलमंत्र
वर्धा -/ मौजा वागदरा ग्रामपंचायत बेलगाव जि. वर्धा येथे ग्रामसुधार बहुउद्देशीय सामाजिक संस्था वरूड, वर्धा अंतर्गत सुरू करण्यात आलेला नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे क्रांतिवीर शामा दादा कोलाम शिक्षण केंद्र. या केंद्रात प्रत्येक रविवारी दोन तास शैक्षणिक तज्ञ मुलांसोबत विविध उपक्रम राबवीत असतात. खेळातून सहज सोपे शिक्षण देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. आदिम जमातीतील कोलाम समुदायातील मुलांना शिक्षणाची गोडी लागून उच्च शिक्षणाकडे झेप घेण्याचा उद्देशाने हा उपक्रम सुरू आहे.
या उपक्रमातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व संवाद साधण्यासाठी विशेष अतिथी म्हणून अझीम प्रेमजी विद्यापीठ बंगलोर येथून एम ए. इन एज्युकेशन चे शिक्षण घेतलेल्या आणि धान फाउंडेशन मध्ये कामाचा अनुभव असणाऱ्या पूजा अनंतराव हेलुंडे उपस्थित होत्या. त्यांनी आदिम जमाती च्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत ग्रामिण भागातील मुलामुलींनी नियमित अभ्यास, जिज्ञासा आणि आत्मविश्वासाच्या बळावर उच्च शिक्षणाचे ध्येय गाठण्याचे आवाहन केले. खेळ आणि विविध कृतींच्या माध्यमातून शिक्षण अधिक आनंददायी व प्रभावी होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शैक्षणिक व क्रीडा साहित्याची उणीव प्रकर्षाने दिसून येत होती. ही उणीव दूर करण्याच्या उद्देशाने संस्थेच्या वतीने साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी लोकसहभाग घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आणि यासाठी लोकांकडून आर्थिक मदतीचे आव्हान करून निधी गोळा करण्यात आला होता. या निधीतून मुलांसाठी शैक्षणिक व खेळाचे साहित्य खरेदी करण्यात आले होते त्याचे वितरण देखील प्रमुख अतिथी पूजा हेलुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमासाठी ऐश्वर्या जाधव, शुभम वानखेडे, प्रणित ठाकरे, प्रणाली चौधरी, अभिजीत काळे, मीनाक्षी चिदानंद, इरफान शेख, उज्वला चुनारकर, नागेश मगरे, नितीन बरमकर, विजय दरणे, मनोज काकडे आणि राहुल उलमळे यांनी आर्थिक सहकार्य केले होते त्यांचे संस्थेच्या वतीने मनस्वी आभार मानण्यात आले.
यावेळी ग्रामसुधार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या तेजस्विनी कुकडे, भारती डोळसकर, नितीन ठाकरे, जगदीश डोळसकर, रोशन हेलुंडे, भूविक कुकडे, हार्दिक डोळसकर, अमोल कुकडे यांच्यासह गावातील मुले-मुली, शोभाताई चाफले, अर्चना महाजन, रसिका चाफले आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.