आपटी-कोसुर्ला रेती घाटातील अवैध रेती वाहतूक करणार्‍या वाहनावर महसूल विभागाची कारवाई: तहसीलदारांनी केले ३ ट्रक जप्त.

0

नितिन हिकरे/राळेगांव प्रतीनिधी:                   

मारेगांव तालुक्यातील आपटी-कोसुर्ला येथील रेती घाटाचा लिलाव होवून त्यातून रेतीचे उत्खनन सुरु झाले आहे. त्यातच वाळू चोरटे सुद्धा वाळू चोरीच्या कामात सक्रिय झाले असून विना रॉयल्टि रेतीची अवैध वाहतूकीवर अधिक भर दिसत असल्याने नागरिकांकडून वेळोवेळी तक्रारी प्राप्त झाल्या नंतर राळेगाव तालुक्याचे तहसिलदार डॉ. रविंद्र कानजडे यांनी महसुल कर्मचार्‍यांसोबत घटनास्थळी जावून अवैध रेतीची वाहतूक करणारे एक टिप्पर व दोन ट्रक यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे कसलीही वैध रॉयल्टि मिळालेली नाही.

ज्यामुळे, वाळू/रेती निर्गती सुधारित धोरण शासन निर्णय क्र. गौखनि-१०/०२१९/प्र.क्र.९/ख-१, दिनांक: ०३.०९.२०१९ चे खुले उल्लंघन झाल्याचे स्पष्ट निदर्शनास येत असून महसूल विभाग वरील धोरणानुसार सदर रेतीघाटाच्या लिलाव धारकावर कार्यवाई करणार का ? असा प्रश्न जनतेस पडला आहे.

अश्यातच, अवैध उत्खनन विना रॉयल्टी दिवसातून अनेक अवैध वाहने जात असल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे. एकीकडे शासनाने वरीलप्रमाणे सुधारित धोरण निर्गमित केले असून एकही रेटीघाट वरील धोरणाची अमलबजावणी करीत असल्याचे दिसून येत नाही.

वरील धोरणातील नियम XII वाळू/रेती उत्खननासाठी सर्वसाधारण निर्बंध व अटीं/शर्तींचे सुद्धा उल्लंघन होत असल्याचे रेती घाटांवरून स्पष्ट दिसते तसेच शासनाने लादलेल्या निर्बंधाप्रमाणे लिलाव धारकाने त्याला मंजूर केलेल्या वाळू गटाच्या ठिकाणी फलक लावून, उत्खनन क्षेत्राची सीमा निश्चित करून सीमा दर्शविणारा खांब उभारणे अनिवार्य असतानासुद्धा एकही रेटीघाटात फलक दर्शक खांब, तसेच रेती उपस्याच्या ठिकाणी CCTV कॅमेरा बसविल्याचे सुद्धा दिसत नाही.

तसेच, वरील निर्बंधांमध्ये XIV नुसार शासनाने जिल्हाधिकारी यांनी करावयाची कार्यवाहीसुद्धा प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून उल्लेखित केलेली असूनसुद्धा एकही रेती घाटावर चेकनाके निश्चित केल्याचे दिसून येत नाही. जिल्हा प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे अवैध रेती चोरांचे अवैध धंदे जोरात सुरू असून त्यांच्यावर आला घालणे कठीण झालेले आहे.

अश्यातच, राळेगाव तालुका दंडाधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील तरतुदींनुसार अवैध वाळू उत्खननावर केलेली कार्यवाही ही कौतुकास्पद असून शासन निर्देशानुसार रेतीचोर व संबंधित रेतीघाट धारक यांच्यावर प्रचलित नियमांनुसार कार्यवाहीच्या स्वरुपात भारतीय दंड विधी संहितेचे कलम ३४, ११४,३७९,३९२,३९३,३९४,३९६ इत्यादि कलामांतर्गत गुन्हा दाखल करण्याची सिफारीष संबंधित शासनास करेल का याबत साहासिकचे तालुका प्रतीनिधी यांनी तहसिलदार यांच्याशी संपर्क साधून त्यांचे मत घेतले असता त्यावरून सद्यास्थितीत नेमकी कोणती कार्यवाही होणार आहे हे अजून पडद्याआड आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!