🔥फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी अमोल कोमावार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.
यवतमाळ -/जिल्हातील निळोना (गोधनी) परिसरात शासनाच्या ई-क्लास जमिनीवर अवैध गौण खनिज उत्खनन सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याबाबत व्हिसल ब्लोअर अमोल ओमप्रकाश कोमावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर तक्रार दाखल करुन संबंधितांवर तात्काळ जप्ती, दंडात्मक कारवाई आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
राजेश राव यांच्या मार्फत जेसीबीच्या साहाय्याने कोणतीही शासकीय परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन सुरू होते. दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी स्वतः घटनास्थळी जाऊन कोमावार यांनी जेसीबी व टिप्परद्वारे सुरू असलेल्या उत्खननाचे व्हिडिओ चित्रीकरण केले. हे व्हिडिओ तहसीलदार योगेश देशमुख, उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, मंडळ अधिकारी संदीप मेहरे व तलाठी टेकाम यांना पाठवून तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली. मात्र, कारवाई करण्याऐवजी संबंधित तलाठ्याने राजेश राव यांना सूचित करून जेसीबी घटनास्थळावरून हटविण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला असून प्रशासनातील काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताचा संशय व्यक्त होत आहे. या बाबतची तक्रार करताच मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. कोमावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात अवैध उत्खननाचा पंचनामा, तोडण्यात आलेल्या सागवान झाडांचा पंचनामा करून संबंधित कर्मचारी व राजेश राव यांच्यावर कारवाई करावी, तसेच घटनास्थळी वापरण्यात आलेली 4 टिप्पर वाहने व जेसीबी जप्त करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे. गोधणी येथे चार एकर मध्ये जवळपास वीस हजार ब्रास गौण खनीज उत्खनन करण्यात आले असून फक्त सातशे ते आठशे ब्रास उत्खनन दाखविल्याचा आरोप आहे. यवतमाळ तालुक्यात रेल्वे प्रकल्पात सुध्दा 62 कोटी रुपयांचे अवैध गौण खनीज उत्खनन झाल्याचे समोर आले आहे. याव्यतिरिक्त परिसरात कोट्यवधी रुपयांचे उत्खनन झालेले आहे. खुलेआम गौण खनीज तस्करी सुरु असतांना यवतमाळचे तहसिलदार कठोर कारवाई का करीत नाही? असा प्रश्न आता अमोल कोमावार यांनी उपस्थित केला आहे.
🔥वन विभागाकडे तक्रार.
गोधणी परिसरात अवैध गौण खनीज उत्खनन करतांना सत्तर ते ऐंशी सागवानाची झाडे सुध्दा तोडण्यात आल्याची तक्रार वनविभागाकडे करण्यात आली आहे. याबाबत विशेष चौकशी तसेच पंचनामे करुन सागवान झाडांची कत्तल केल्याप्रकरणी राजेश राव यांचेविरुध्द वन कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी अमोल कोमावार यांनी केली आहे.