घरकुलाची रेती मोफत, वाहतुकीचा ५ ते ७ हजारांचा भार!

0

🔥घरकुलाची रेती मोफत, वाहतुकीचा ५ ते ७ हजारांचा भार!

🔥अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा; मातीमिश्रित रेतीच्या तक्रारी, अधिकाऱ्यांच्या पाहणीवर प्रश्नचिन्ह

हिंगणघाट -/ घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना शासनाकडून ५ ब्रास रेती मोफत देण्यात येत असली, तरी ती घरापर्यंत पोहोचविण्याचा वाहतूक खर्च लाभार्थ्यांनाच करावा लागत आहे. हिंगणघाट तालुक्यात हा खर्च सुमारे ५ ते ७ हजार रुपये येत असल्याने घरकुल लाभार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

दरम्यान, तालुक्यातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास येत असल्याचा दावा केला जात आहे. काही ठिकाणी या रेतीचा चिल्लर विक्रीसाठी वापर होत असल्याचीही चर्चा आहे. या साठ्यांना कोणाची परवानगी आहे, त्याचा स्रोत काय आहे आणि घरकुलासाठी उपलब्ध करून दिलेल्या रेतीशी त्याचा संबंध आहे का, याची महसूल विभागाने तपासणी करण्याची मागणी होत आहे.

दुसरीकडे, घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या रेतीमध्ये मातीचे मिश्रण असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे रेतीचे प्रमाण आणि गुणवत्ता यांची प्रत्यक्ष जागेवर तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अनेक ठिकाणी रेतीचे साठे असूनही संबंधित अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करीत नसल्याने प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप लाभार्थ्यांकडून केला जात आहे. रेतीचे मोजमाप, गुणवत्ता, वाहतूक आणि परिसरातील अतिरिक्त साठे यांची संयुक्त पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.

घरकुलासाठी मंजूर ५ ब्रास रेती प्रत्यक्ष लाभार्थ्यांना पूर्ण प्रमाणात मिळते का? रेतीची गुणवत्ता तपासली जाते का? तसेच परिसरातील मोठ्या साठ्यांची परवानगी आणि स्रोत तपासला जातो का? याकडे आता वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 हिंगणघाट,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!