यवतमाळ -/ कष्टाच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या आर्थिक गुन्हेगारांविरोधात आज पुसदच्या रस्त्यांवर संतापाचा ज्वालामुखी उसळला! सट्टेखोर शरद मैंदने हडप केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी परत मिळवण्यासाठी हवालदिल झालेल्या शेकडो ठेवीदारांनी भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयावर थेट धडक दिली. “आमचे पैसे परत करा, नाहीतर गाठ आमच्याशी आहे,” असा आक्रमक इशारा देत संतप्त नागरिकांनी कार्यालयाची दारे दणाणून सोडली. आयुष्यभराची पुंजी सुरक्षित राहावी म्हणून विश्वासाने बँकेत ठेवणाऱ्या सामान्य जनतेला आज रस्त्यावर उतरून स्वतःच्याच हक्काच्या पैशांसाठी भीक मागावी लागत आहे, तर दुसरीकडे यवतमाळचे झारीतील शुक्राचार्य ठरलेले निबंधक अधिकारी मूग गिळून गप्प बसल्याने या लाचखोर आणि भ्रष्ट व्यवस्थेविरोधात ठेवीदारांचा तीव्र आक्रोश उफाळून आला आहे.
वर्षानुवर्षे रक्ताचे पाणी करून, काबाडकष्ट करून साठवलेली पुंजी डोळ्यांदेखत बुडताना पाहून सामान्य माणूस किती हताश आणि आक्रमक होऊ शकतो, याचे विदारक आणि थरारक दृश्य आज पुसद शहरात पाहायला मिळाले. भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेत अडकलेला स्वतःचा घामाचा पैसा परत मिळवण्यासाठी शेकडो ठेवीदारांनी आज रस्त्यावर उतरून ऐतिहासिक ‘एल्गार मोर्चा’ काढला. हा मोर्चा केवळ निषेध नोंदवण्यासाठी नव्हता, तर पतसंस्थेचा कर्ताधर्ता आणि कोट्यवधींचा चुराडा करणारा सट्टेखोर शरद मैंद याच्या आर्थिक मनमानीविरोधात पुकारलेले थेट युद्ध होते.पुसद शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या मोर्चात वृद्ध, शेतकरी, कष्टकरी, विधवा महिला आणि सेवानिवृत्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात फलक आणि डोळ्यांत संतापाची धग घेऊन निघालेला हा मोर्चा भारती मैंद पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासमोर पोहोचताच वातावरण कमालीचे तापले. आंदोलकांनी पतसंस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठाण मांडून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. “शरद मैंद हाय हाय”, “ठेवीदारांचे पैसे परत करा”, अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. संताप इतका अनावर होता की, पतसंस्थेच्या व्यवस्थापनाने कार्यालयाचे शटर तातडीने ओढून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठेवीदारांनी मुख्य कार्यालयाला चारही बाजूंनी घेराव घालत तासनतास निदर्शने चालू ठेवली.
मोर्चातील आंदोलकांनी शरद मैंद याच्या काळ्या कारभाराची पोलखोल केली. पतसंस्थेत जमा झालेली रक्कम सामान्य ग्राहकांना विश्वासात न घेता स्वतःच्या वैयक्तिक सट्टा व्यवसायात आणि संशयास्पद व्यवहारांमध्ये गुंतवून शरद मैंदने ही पतसंस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवली असल्याचा गंभीर आरोप ठेवीदारांनी केला. ठेवीदारांच्या मुलींची लग्ने मोडत आहेत, आजारी वृद्धांना औषधोपचारासाठी पैसे उरलेले नाहीत, तर विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण पैशांअभावी रखडले आहे. स्वतःचे हक्काचे पैसे मागण्यासाठी गेल्यावर व्यवस्थापनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने ठेवीदारांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.
या संपूर्ण आर्थिक गैरव्यवहारात सर्वात धक्कादायक आणि चीड आणणारी बाब म्हणजे यवतमाळ येथील सहकार निबंधक अधिकाऱ्यांचे या प्रकरणाकडे असलेले अक्षम्य दुर्लक्ष! शेकडो ठेवीदारांनी वारंवार तक्रारी, निवेदने आणि पुरावे देऊनही निबंधक कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यांनी या पतसंस्थेवर साधी कारवाई करण्याची तसदी घेतलेली नाही. निबंधक अधिकारी कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत? सट्टेखोर शरद मैंदला पाठीशी घालण्यासाठी निबंधक कार्यालयाला नेमकी कोणती ‘अर्थपूर्ण’ रसद पुरवली जात आहे? असा परखड सवाल मोर्चातील संतप्त नागरिकांनी उपस्थित केला. नियामक संस्थाच जर आर्थिक गुन्हेगारांसोबत हातमिळवणी करणार असतील, तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कोणाकडे, असा संतप्त आक्रोश आंदोलकांनी व्यक्त केला.
या मोर्चादरम्यान ठेवीदारांच्या प्रतिनिधींनी जाहीर केले की, हा मोर्चा म्हणजे केवळ एक ठिणगी आहे. जर तातडीने शरद मैंदवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्याच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या नाहीत आणि ठेवीदारांची मुद्दल व्याजासह परत करण्यात आली नाही, तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल. निबंधक कार्यालयावर टाळे ठोकण्याचा इशाराही यावेळी संतप्त ठेवीदारांनी दिला. शासनाने या गंभीर आर्थिक फसवणुकीची तात्काळ दखल घेऊन ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा हा आक्रोश उग्र संघर्षाचे रूप धारण करेल, असा स्पष्ट इशारा आजच्या एल्गार मोर्चातून देण्यात आला.