टिप्परची दुचाकीला धडक, 1 ठार दोन जखमी – काजळी ते बांगडापूर वळण मार्गावरील घटना
Byसाहसिक न्यूज24
प्रतिनिधी/ वर्धा:
कन्नमवारग्राम येथील काही युवक नागपूरला दुचाकीने जात असताना कोंढालीकडून बांगडापूरकडे भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज बुधवार 31 रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास काजळी ते बांगडापूर वळण मार्गावर घडली. गजानन श्रावण कोवे (19) असे मृतकाचे नाव आहे.
बुधवारी गणेशाची स्थापना असल्याने सर्वत्र धावपळ सुरू होती. याच कामानिमित्त कन्नमवारग्राम येथील वाजंत्रीचे काम करणारे काही युवक सकाळी 9 च्या सुमारास नागपूर येथे दुचाकीने जात होते. काजळी ते बांगडापूर वळण रस्त्यावर कोंढालीकडून बांगडापूरकडे भरधाव वेगात येत असलेल्या एम. एच. 05 ई. एल. 1229 क्रमांकाच्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील गजानन कोवे याचा जागीच मृत्यू झाला. तर राहुल नेहारे (22) याच्या दोन्ही पायावरून टिप्पर गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. तर समीर कोवे (14) हा किरकोळ जखमी झाला आहे. अपघात होताच टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व टिप्पर ताब्यात घेतला. पुढील तपास ठाणेदार दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात प्रवीण चोरे करत आहे.