🔥ठेवीदारांच्या घामाच्या पैशांवर ‘चिंतामणी’चा डल्ला?;पैसे परत देण्यास टाळाटाळ, जिल्हा निबंधकांचाही कारभार संशयास्पद
🔥यवतमाळात पतसंस्थांच्या नावाखाली लुटमारीचा नवा फंडा; ‘चिंतामणी अर्बन’ डबघाईच्या मार्गावर, सामान्य ठेवीदार हवालदिल!
यवतमाळ -/ यवतमाळ शहरातील गांधी चौक येथील मुख्य शाखेतून ‘चिंतामणी अर्बन क्रेडिट को. सोसायटी मल्टीस्टेट बँके’ने ठेवीदारांचे हक्काचे पैसे देण्यास नकार दिल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून सामान्य नागरिकांची आयुष्यभराची पुंजी गोळा करायची आणि नंतर संस्था डबघाईस आल्याचे सांगून हात वर करायचे, असा गोरखधंदाच सध्या शहरात फोफावला आहे. या गंभीर प्रकाराविरोधात तक्रारींचा पाऊस पडूनही जिल्हा निबंधक कार्यालय मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे. दैनिक ‘साहसिक’च्या दणक्यानंतर एका ठेवीदाराचे पैसे परत मिळाले असले, तरी शेकडो ठेवीदार आजही आपल्याच पैशांसाठी बँकेचे उंबरठे झिजवत आहेत.
यवतमाळ शहरातील सहकार क्षेत्राला सध्या भ्रष्टाचाराची आणि मनमानी कारभाराची कीड लागली असून, सामान्य कष्टकरी व मध्यमवर्गीय नागरिकांच्या ठेवी सुरक्षित आहेत की नाहीत, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील अनेक पतसंस्था यापूर्वीच डबघाईस आल्याने हजारो ठेवीदार देशोधडीला लागले असतानाच, आता गांधी चौक येथील मुख्य शाखेमार्फत कार्यरत असलेल्या ‘चिंतामणी अर्बन क्रेडिट को. सोसायटी मल्टीस्टेट बँके’चा कारभारही संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या बँकेतून ठेवीदारांचे विड्रॉल (पैसे काढणे) पूर्णपणे ठप्प झाले असून, स्वतःच्या हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी ठेवीदारांना बँकेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. यामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुदत पूर्ण होऊनही आणि अत्यंत निकडीची गरज असतानाही चिंतामणी अर्बन सोसायटीकडून ठेवीदारांना पैसे परत दिले जात नाहीत. बँकेत गेल्यावर कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून, तांत्रिक अडचणी किंवा निधीची कमतरता असल्याचे सांगून ठेवीदारांची बोळवण केली जात आहे. या मनमानी कारभाराचा असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. शहरातील आर्णी रोड परिसरात राहणारे अग्रवाल नामक एका ठेवीदाराने आपल्या गरजेसाठी बँकेकडे हक्काच्या पैशांची मागणी केली होती. मात्र, बँक प्रशासनाने त्यांना पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. हतबल झालेल्या अग्रवाल यांनी आपली कैफियत ‘दैनिक साहसिक’कडे मांडली.दैनिक साहसिक’ने या प्रकरणाची गंभीर दखल घेत बँकेच्या या मनमानीविरोधात परखड वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रसिद्ध होताच बँक प्रशासनाचे धाबे दणाणले आणि आपली प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून तातडीने संबंधित ठेवीदाराला त्यांचे पैसे परत करण्यात आले. या घटनेवरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, बँकेकडे पैसे देण्याची क्षमता असूनही जाणीवपूर्वक ठेवीदारांची पिळवणूक केली जात आहे. ‘साहसिक’च्या दणक्यानंतर एका ठेवीदाराला न्याय मिळाला खरा, परंतु आजही असे शेकडो सामान्य ठेवीदार आहेत, ज्यांचे कोट्यवधी रुपये या संस्थेत अडकून पडले आहेत. कोणाच्या घरी लग्नकार्य आहे, तर कोणाच्या घरी आजारपणाचे संकट ओढवले आहे; अशा परिस्थितीत स्वतःच्याच कष्टाचे पैसे मिळत नसल्याने ठेवीदार अक्षरशः हवालदिल झाले आहेत.
या संपूर्ण प्रकरणात सर्वात संतापजनक आणि संशयास्पद भूमिका ही सहकार विभागाची, विशेषतः जिल्हा निबंधक अधिकाऱ्यांची आहे. या बँकांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची आणि ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्याची कायदेशीर जबाबदारी ज्या जिल्हा निबंधक अधिकाऱ्यांकडे आहे, त्यांच्याकडे या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र, तक्रारी येऊनही संबंधित अधिकाऱ्यांकडून या संस्थेवर कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. निबंधक कार्यालयाच्या या गूढ मौनामुळे आणि अक्षम्य दुर्लक्षामुळे बँक संचालकांचे चांगलेच फावले आहे. जिल्हा निबंधक कार्यालय हे ठेवीदारांच्या रक्षणासाठी आहे की भ्रष्ट संस्थाचालकांना पाठीशी घालण्यासाठी, असा संतप्त सवाल आता यवतमाळकर विचारू लागले आहेत. यवतमाळ शहरात सध्या पतसंस्थांच्या नावाखाली सामान्य जनतेला लुटण्याचा एक नवा आणि अत्यंत घातक फंडा सुरू झाला आहे. सुरुवातीला आकर्षक व्याजदराचे आणि घामाचे पैसे दामदुप्पट करून देण्याचे गोड आमिष दाखवायचे, एजंटांच्या माध्यमातून सामान्य कष्टकरी, निवृत्त कर्मचारी आणि व्यापाऱ्यांची आयुष्यभराची कमाई गोळा करायची आणि जेव्हा पैसे परत देण्याची वेळ येते, तेव्हा ‘संस्था तोट्यात गेली’, ‘पतसंस्था बुडाली’ असे सांगून हात मोकळे करायचे, असा हा प्रकार आहे. चिंतामणी अर्बन सोसायटीची वाटचालही याच दिशेने सुरू असल्याची भीती आता ठेवीदारांकडून व्यक्त केली जात आहे.
एकंदरीत परिस्थिती पाहता, ‘चिंतामणी अर्बन क्रेडिट को. सोसायटी’चा कारभार अत्यंत संशयास्पद बनला आहे. या संस्थेत नेमके किती कोटींच्या ठेवी आहेत, त्या पैशांची गुंतवणूक कोठे करण्यात आली आणि ठेवीदारांना पैसे देण्यास टाळाटाळ का केली जात आहे, याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. प्रशासनाने आणि सहकार विभागाने तातडीने या संस्थेच्या व्यवहारांची चौकशी करून दोषी संचालकांवर कठोर गुन्हे दाखल करावेत, तसेच सर्व सामान्य ठेवीदारांचे अडकलेले पैसे व्याजासह परत मिळवून द्यावेत, अशी जोरदार मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, ठेवीदारांच्या संतापाचा उद्रेक होऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे.(क्रमशः)